aditi tatkare

राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Scheme) लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे यादीतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्याची अपेक्षा आहे. अंगणवाडी सेविकांना महिलांचे आधार कार्ड आणि बँक खात्यांवर असलेली नावे, वार्षिक उत्पन्नाचे दाखले, अधिवासाचे दाखले, चारचाकी वाहने आणि सरकारी नोकऱ्या अशा बाबी  तपासण्यास सांगण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची कागदपत्रे तसेच त्यांची आर्थिक स्थिती देखील तपासतील. अशात बातमी आली होती की, रायगड जिल्ह्यातील 15 हजार महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. मराठी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले होते. मात्र आता स्वतः आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून या महिला  अपात्र झाल्याचे वृत्त जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले आहे.

सोशल मिडियावर मंत्री तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणतात, ‘दिनांक 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकषांच्या आधारावर महिलांनी अर्ज केले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र महिलांची वर्गवारी केली. त्यानुसार रायगड जिल्ह्यातून आलेल्या एकूण अर्जांपैकी सुमारे 6 लाख अर्ज पात्र ठरले, तर 15,849 महिला अर्ज छाननी प्रक्रियेतच अपात्र ठरल्या होत्या. ही संपूर्ण प्रक्रिया बऱ्यापैकी सुमारे दिनांक 10 ऑक्टोबर 2024 पूर्वीच पार पडली आहे.’

मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण-

त्या पुढे सांगतात, ‘पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मार्च 2025 पर्यंतचा सन्मान निधी यशस्वीरित्या वितरित करण्यात आला आहे. ज्या अर्जदार कधी योजनेसाठी पात्रच ठरल्या नाहीत, ज्यांना कधी योजनेचा लाभ देण्यात आला नाही, त्या महिलांना पुन्हा नव्याने अपात्र ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हा खोटा संदर्भ देऊन करण्यात आलेले वृत्त धादांत खोटे व खोडसाळ आहे. महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. एकाही पात्र भगिनीवर अन्याय होणार नाही हा शब्द मी संपूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना देते.’ (हेही वाचा: Maharashtra Lottery: 'महाराष्ट्राने महसूल वाढवण्यासाठी केरळची लॉटरी पद्धत स्वीकारावी,' भाजप नेते Sudhir Mungantiwar यांचे विधान)

दरम्यान, सुमारे 2.46 कोटी लाभार्थ्यांपैकी, गेल्या महिन्यात राज्याने सुमारे 5 लाख लाभार्थ्यांची नावे वगळली. यामध्ये 1.5 लाख लाभार्थ्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे 2 लाख लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळत होती, जी दरमहा 1500 रुपये आहे. राज्याने आधीच स्पष्ट केले आहे की, नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत दरमहा 1000 रुपये मिळणारे पैसे, लाडकी बहिण योजनेत समाविष्ट केले जाईल आणि जे दोन्हीसाठी पात्र असतील त्यांना लाडकी बहिण योजनेद्वारे 1500 रुपये मिळतील.