आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) मधील महानिर्वाणी आखाड्याचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचे निधन झाले आहे. कोरोना संसर्गाने ग्रासलेल्या स्वामी कपिल देव यांच्यावर देहरादून (Dehradun) येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मध्य प्रदेश मधील हरिद्वार (Haridwar) येथे आयोजित कुंभमेळ्यात आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव सहभागी झाले होते. या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना देहरादून मधील कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती हरिद्वारचे चीफ मेडिकल ऑफिसर एस.के. झा यांनी दिली. (Kumbh Mela 2021: हरिद्वार येथील कुंभमेळा ठरतोय Coronavirus उद्रेकाचे कारण, दोन दिवसांमध्ये 1,000 जण COVID 19 संक्रमित)
13 एप्रिल रोजी उपचारादरम्यान स्वामी कपिल देव यांचे रुग्णालयात निधन झाले, अशी माहिती पोलिस अधिकारी सरिता ढोभाळ (Sarita Dobhal) यांनी दिली आहे. 10 एप्रिलपासून सुरु झालेल्या हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत 1700 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातील या भव्य सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याने येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा धोका अधिक आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत 2,36,571 टेस्ट केल्या असून त्यापैकी 1701 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे हरिद्वार कुंभातील संतांच्या 13 आखाड्यांपैकी एका निरंजन अखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात अखाड्याने सांगितले की, त्यांच्या अनेक सांधूंमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. अखंड महंतचे सचिव रवींद्र पुरी यांनी यावेळी इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचे आवाहन केले आहे.