बदलापूरपाठोपाठ आता कोल्हापुरातूनही (Kolhapur) अत्याचाराची घटना समोर आली आहे. येथे शिये गावात असलेल्या उसाच्या शेतात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आहे. काल दुपारीच ही मुलगी बेपत्ता झाली होती. दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे कुटुंब बिहारचे आहे. हे लोक शेतात मजूर म्हणून काम करतात. कुटुंबीयांनी सांगितले की, ही मुलगी काल दुपारपासूनच बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही. अखेर आज सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी दोन संशयितांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बलात्कार आणि हत्या या अनुषंगाने तपास सुरु केला आहे. महत्वाचे म्हणजे आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरात होते, आणि त्याचवेळी ही घटना समोर आली आहे. (हेही वाचा: Mumbai Crimes Against Women: मुंबईत जानेवारी ते मे 2024 पर्यंत महिलांविरोधातील 2,584 गुन्ह्यांची नोंद; समोर आली धक्कादायक आकडेवारी)
दरम्यान, बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबतच्या जनहित याचिकेची, मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. याबाबत आज सुनावणी पार पडली, ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने कडक निरिक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले, ‘जर शाळाच मुलींसाठी सुरक्षित नसतील, तर शिक्षणाच्या अधिकारावर बोलण्यात काय फायदा?’ यासोबतच उच्च न्यायालयाने या प्रकरणाची माहिती लपवल्याप्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास सांगितले आहे.