Mumbai Crimes Against Women: सध्या संपूर्ण देशात कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण आणि बदलापूर लैंगिक शोषण घटनेबाबत गदारोळ माजला आहे. दोन्ही प्रकरणामधील आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. आता एका अहवालात मुंबईमधील महिलांवरील अत्याचाराचे (Crimes Against Women) धक्कादायक आकडे समोर आले आहेत. मुंबईत जानेवारी ते मे महिन्यापर्यंत महिलांवरील अत्याचाराचे 2,584 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आले आहे. यातील 232 प्रकरणे अल्पवयीन मुलींवर बलात्काराची, 262 प्रकरणे अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाची आणि एक डझन प्रकरणे अल्पवयीन मुलींची छेड काढण्याबाबतची आहेत.
या कालावधीत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 507 गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 442 गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या 232 प्रकरणांपैकी 220, अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या 262 पैकी 254 प्रकरणांचा छडा लावला गेला.
महिलांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणांच्या विश्लेषणातून असे दिसून आले की, बलात्काराच्या 165 प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी 137 गुन्हे उघडकीस आले आहेत. महिलांच्या विनयभंगाच्या 977 प्रकरणांपैकी 89८ प्रकरणे आढळून आली. महिलांबद्दल असभ्यतेची एकूण 291 प्रकरणे नोंदवण्यात आली, त्यापैकी 263 प्रकरणे उघडकीस आली. शहरात हुंड्यामुळे मृत्यूचे पाच आणि हुंड्यासंबंधी आत्महत्यांचे चार आणि हुंड्यासंबंधी मानसिक व शारीरिक छळाचे 192 गुन्हे दाखल झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा: High Court On Badlapur Sexual Assault: 'शाळाच सुरक्षित नसतील, तर शिक्षणाच्या अधिकारावर बोलण्यात काय फायदा?’; बदलापूर आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत Bombay High Court ची टिपण्णी)
दरम्यान, सध्या महिलांच्या सुरक्षेबाबत देशभरात पुन्हा एकदा संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांबाबत रस्त्यावर उतरून आंदोलने होत आहेत. शाळा असो, रस्ता असो, घर असो, महिला कुठेही सुरक्षित नाहीत. अगदी निष्पाप मुली आणि वृद्ध महिलाही क्रूरतेचे बळी ठरत आहेत. महिलांवरील बलात्काराची प्रकरणे ही भारतातील गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. साधारण 2017 ते 2022 दरम्यान, भारतात सरासरी दररोज 86 बलात्काराची प्रकरणे नोंदवली गेली आणि यापैकी 82 प्रकरणांमध्ये, गुन्हेगार महिलेच्या ओळखीची व्यक्ती होती. अशा प्रकारे, दर तासाला अंदाजे चार महिलांवर बलात्कार होतो.