Khalapur News Photo credit twitter

Khalapur Irshalgad Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे अत्यंत भयावह दुर्घटना घडली आहे. मोरबे डॅमच्या वरच्या बाजूस असलेल्या इर्शाळवाडी गावावर काळाने घाला घातला. रात्रीच्या अंधारात दरड कोसळल्याने अवघे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ज्यांना वाट दिसली, आपले प्राण वाचवू शकले असे लोक जीव मुठीत घेऊन कसेतरी बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी मदत आणि बचावकार्यासाठी निघाले आहे. दुर्घटनाग्रस्त भाग अत्यंत दुर्गम असल्याने घटनास्थळी पोहोचण्याच प्रचंड विलंब लागतो आहे. त्यातच मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने मदत आणि बचाव कार्यासाठी विलंब लागतो आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी नियंत्रणकक्ष (कंट्रोलरुम) तयार करण्यात आला असून हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करुन दिला आहे.

रायगड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल

दुर्घटनाग्रस्तांना मदत आणि चौकशीसाठी राज्य सरकारने 8108195554  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन केले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत आणि दादा भूसे उपस्थित आहेत. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत किमान 100 लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता लोकांमध्ये 5 ते 6 लहान मुलांचाही समावेश आहे. नातेवाईकांनी आपल्या आप्तेष्टांच्या चौकशीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जाणार आहेत. (Uहेही वाचा, Khalapur Landslide News: खालापुर गावात मोठी दुर्घटना; गावात दरड कोसळल्याने चार लोकांचा मृत्यू तर 60 जण ढिगाऱ्याखाली)

खालापूर- दुर्घटनेत 5 नागरिकांसह एका जवानाचा मृत्यू

राज्याचे उपमुख्यमंत्री नियंत्रण कक्षात दाखल झाले असून ते घटनास्थळावरचा आढावा घेत आहेत. घटनास्थळी टीडीआरएसचे पथकही दाखल झाले आहे. एनडीआरएफकडून युद्धपातीळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत दुर्घटनेतील 21 जणांना नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचाव पथकातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे.