
केरळमध्ये (Kerala) आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या 27 दिवसांच्या बाळाचे डोके भिंतीवर आपटून त्याला मारून टाकले. याप्रकरणी या आईला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. अकाली जन्मलेले बाळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे सतत रडत होते, त्यामुळे त्याच्या 21 वर्षीय आईने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली.
त्यानंतर रात्री साधारण 11 वाजता बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांना दाखविल्यानंतर मुलाला घरी परत आणण्यात आले, परंतु नंतर दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती बिघडली आणि त्याला तालुक्यातील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आश्रम चालवणारे फादर जोजी थॉमस यांच्या जबानीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही महिला या आश्रमाच्या स्वयंपाकघरात काम करते आणि तिच्या 45 वर्षीय प्रियकरसोबत राहते. 10 डिसेंबर रोजी बाळाचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, मुलाच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. यानंतर याबाबत पोलिसांनी मुलाच्या पालकांकडे याची चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की, महिला आणि तिच्या प्रियकराचा फोनवरून संपर्क झाला आणि ते आश्रमात एकत्र राहू लागले. मुलाच्या वडिलांचे आधीच लग्न झाले असून, त्यांच्यासोबत राहत असलेल्या महिलेला याची माहिती होती. (हेही वाचा: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र-गुजरात सरकारला फटकारले, कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना एका आठवड्यात भरपाई देण्याचे आदेश)
नंतर अधिक चौकशीत उघड झाले की महिलेने स्वतःच आपल्या मुलाची हत्या केली होती, त्यानंतर तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ही महिला कोट्टायम येथील एका खाजगी संस्थेत शिकत होती, जेव्हा ती तिच्या प्रियकराला फोनवर भेटली. हे आजारी मूल आपल्या पुढील अभ्यासामध्ये बाधा ठरेल म्हणून तिने मुलाला मारण्याचा निर्णय घेतला.