Kerala Police Commando Dies By Suicide: गेल्या काही दिवसांपासून तणावामुळे आत्महत्या (Suicide) करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. बंगळुरू येथील अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणात अजूनही तपास सुरु आहे. दुसरीकडे नोएडामध्ये नुकतेच एका बेरोजगार तरुणाने प्रेयसीच्या टोमण्याला कंटाळून आत्महत्या केली. आता केरळमधून (Kerala) एका पोलीस कमांडोने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. केरळ पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपमधील कमांडोने सोमवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. विनीत असे मृताचे नाव आहे.
असे सांगितले जात आहे की 35 वर्षीय विनीत त्यांच्या गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी रजा मागत होते. मात्र रजा न मिळाल्याने त्यांना कामाचा ताण सहन होत नव्हता. त्यांनी रविवारी रात्री मलप्पुरम जिल्ह्यातील अरेकोडे पोलीस कॅम्पमध्ये आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली.
कमांडो विनीतच्या मृत्यूमुळे कामाच्या जास्त दबावामुळे आत्महत्या करणाऱ्या केरळ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढत्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. एका अनौपचारिक अंदाजानुसार, सुमारे 90 पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. विनीत हे माओवाद्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपशी संलग्न कमांडो होते. वायनाडचे रहिवासी असलेले विनीत गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे 45 दिवसांपासून सतत काम करत होते. तसेच ते घरी जाण्यासाठी रजा मागत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यांची पत्नी गर्भवती होती. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना रजा दिली नाही. (हेही वाचा: Noida Shocker: लिव्ह-इन पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून बेरोजगार तरुणाने केली गळफास लावून आत्महत्या; नोएडामधील धक्कादायक घटना)
रजा न मिळणे आणि सतत कामाचा दबाव यामुळे विनीत त्रस्त होते. त्यांना हा ताण सहन होत नव्हता. अखेर पोलीस छावणीत त्यांनी सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी अधिका-यांनी पोलिसांचे मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यालाही प्राधान्य दिले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.