Kerala: अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार; न्यायालयाने सुनावली 142 वर्षांची शिक्षा, पाच लाखांचा दंडही ठोठावला
Representational Image (Photo Credits: File Image)

केरळमधील (Kerala) पठाणमथिट्टा येथील स्थानिक न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका व्यक्तीला 142 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एका 41 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार केला आहे. जिल्हा पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पठाणमथिट्टा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जयकुमार जॉन यांनी आनंदन पी.आरला 142 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्याला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

जिल्ह्यातील पॉक्सो (POCSO) प्रकरणातील आरोपीला सुनावण्यात आलेली ही सर्वाधिक शिक्षा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषीला एकूण 60 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. दोषी हा 10 वर्षीय पीडितेचा नातेवाईक आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या विविध कलमांखाली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने सांगितले की, आरोपीने 2019-21 दरम्यान मुलीचे लैंगिक शोषण केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदन 2019 मध्ये पिडीत मुलीच्या कुटुंबासह राहायला आला होता. मुलीचे आई-वडील घरात नसताना तो 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करायचा. याआधी ऑगस्टमध्ये केरळमधील जलदगती न्यायालयाने अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट अंतर्गत अनेक गुन्ह्यांसाठी एकूण 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. (हेही वाचा: दिल्लीत 11 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, दोन आठवड्यांनंतर मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, दोघांना अटक)

विशेष सरकारी वकील एसएस सनेश यांनी सांगितले होते की, 2018 मध्ये, इडुक्की जिल्ह्यात आईच्या अनुपस्थितीत एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर घरात बलात्कार केला. एसपीपीने सांगितले की, पीडित मुलगी आणि घटनेची साक्षीदार असलेल्या तिच्या लहान बहिणीच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. खटल्यादरम्यान पीडितेच्या आईने विरोध केला होता.