ISRO चे माजी शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांना खोट्या हेरगिरी प्रकरणात निष्कारण गुंतवल्याप्रकरणी केरळ सरकारने दिली 1.3 कोटींची भरपाई
File image of Nambi Narayanan | (Photo Credits: PTI)

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (ISRO) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांना अखेर न्याय मिळाला आहे. 1994 मध्ये हेरगिरीच्या खोट्या प्रकरणात (Spy Case) अडकलेल्या नंबी नारायणन यांना केरळ सरकारने मंगळवारी 1.3 कोटी रुपयांची भरपाई दिली. 78 वर्षीय नारायणन यांनी बेकायदेशीर अटक आणि छळाची भरपाई करण्यासाठी, न्यायालयात रक्कम वाढवण्यासाठी दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी ही नुकसान भरपाई देण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी नारायणन यांना रक्कम दिली गेल्याची पुष्टी केली. अहवालानुसार नुकसान भरपाईच्या रकमेचा धनादेश स्वीकारत नारायणन म्हणाले की, 'मी आनंदी आहे, माझा लढा हा पैशांसाठी नव्हता तर तो अन्यायाविरूद्ध होता.’

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तीन आठवड्यांपूर्वी सरकारने नारायणन यांना यापूर्वी 50 लाख रुपयांची रक्कम दिली होती. त्याचवेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्यांना दहा लाख रुपयांची स्वतंत्र नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली होती. 1994 मध्ये हेरगिरीच्या खोट्या प्रकरणात त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता की, भारतीय अवकाश कार्यक्रमाशी संबंधित काही अत्यंत गोपनीय कागदपत्रे त्यांनी परदेशात हस्तांतरित करण्यात त्यांचा हात होता. यासाठी नारायणन यांना दोन महिने तुरूंगात घालवावे लागले होते. नंतर सीबीआयने त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. सीबीआयपूर्वी केरळ पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. (हेही वाचा: Kozhikode Plane Crash: कोझिकोड मधील विमान अपघाताप्रकरणी जखमी झालेल्या 85 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज)

इस्रो हेरगिरी प्रकरणात दोन शास्त्रज्ञ आणि दोन मालदीव महिलांसह चार वैज्ञानिकांद्वारे, काऊन्टीच्या क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाची काही गोपनीय कागदपत्रे आणि रहस्ये शत्रू देशांकडे हस्तांतरित केल्याचा आरोप केला होता. त्यात नंबी नारायण यांचेही नाव होते. 1994 मध्ये नांबी नारायणन यांच्यावर मालदीवच्या दोन कथित महिला गुप्तचर अधिका-यांना संरक्षण विभागाशी संबंधित गुप्त माहिती दिल्याचा आरोप होता. दरम्यान, या सनसनाटी प्रकरणावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत आणि अभिनेता-दिग्दर्शक आर. माधवन यांने नारायणन यांच्यावर बायोपिक देखील तयार केला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात विलंब झाला आहे. त्याचवेळी नारायणन यांना गेल्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.