ईशान्य बेंगळुरू (Bengaluru) येथील चिक्काजाला येथे एका जोडपे त्यांच्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. वॉशरूममधील गिझरमधून सोडलेल्या विषारी वायूमुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बेंगळुरूच्या येलाहंका तालुक्यातील तारबनहल्ली गावात ही घटना घडली. चामराजनगर जिल्ह्यातील चंद्रशेखर आणि बेलगावी जिल्ह्यातील सुधा राणी अशी मृतांची नावे आहेत. दोघे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका तारांकित हॉटेलमध्ये काम करत होते.
माहितीनुसार, चंद्रशेखर आणि सुधा राणी यांचे लग्न ठरले होते. लग्नापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. चंद्रशेखर एम आणि सुधाराणी हे 10 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तारबनहल्ली येथील त्यांच्या घरी आले. रात्री 9.10 च्या सुमारास हे दाम्पत्य गॅस गिझर चालू करून आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. बाथरुमचे दार आणि खिडकी बंद होती, त्यामुळे हवेला आत जायला जागा नव्हती. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Karnataka: डच व्लॉगरला बेंगळुरूच्या चिकपेट भागात मारहाण, नागरिकांनी मदत केल्यानंतर म्हणाला 'जय श्री राम')
पोलिसांनी सांगितले की, पीडितांनी अंघोळ करताना वॉशरूमच्या खिडक्या आणि दरवाजे बंद केले होते आणि त्यावेळी गीझरमधून बाहेर पडलेला कार्बन मोनोऑक्साइड वायू त्यांच्या शरीरात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर ही घटना उघडकीस आली. रविवारी दुपारी हॉटेलचे कर्मचारी दोघांचा शोध घेत त्यांच्या घरी पोहोचले. घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर दोघांचा मृतदेह वॉशरूममध्ये पडलेला आढळून आला.