Lord Ganesha idol (Photo Credits: Twitter)

कर्नाटकमध्ये (Karnataka) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे तीन वर्षाच्या मुलाने 5 सेमीची गणेशमूर्ती (Ganesha Idol) गिळली होती. त्यानंतर मुलाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती पाहता डॉक्टरांनी एन्डोस्कोपिक पद्धतीने मूर्ती बाहेर काढण्याचा विचार केला आणि मुलाला भूल देऊन लगेचच एका तासामध्ये एंडोस्कोपी तंत्राद्वारे गणेशाची मूर्ती बाहेर काढली. सायंकाळी चार वाजता मुलाला रुग्णालयातून सोडण्यातही आले. आता त्याची प्रकृती ठीक आहे. बेंगळूरुमधील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील मनिपाल रुग्णालयात मुलावर उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुलाने खेळता-खेळता गणेशाची छोटी मूर्ती गिळली. नंतर मुलाला वरच्या छातीत वेदना होऊ लागल्या आणि त्याला लाळ गिळण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर मुलाला ताबडतोब रुग्नालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी मुलाची पुढील तपासणी केली तेव्हा त्यांना दिसून आले की, मूर्ती अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकली आहे. मुलाच्या गळ्यात प्रचंड वेदना होत होत्या. त्यानंतर सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे मुलाच्या अन्न नलिकेमधून मूर्ती काढून टाकण्यात आली.

या प्रक्रियेनंतर मुलाला तीन तास निरीक्षणाखाली ठेवले गेले आणि संध्याकाळपर्यंत त्याला सोडण्यात आले. मनिपाल हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत केपी म्हणाले की, मुलाच्या छातीचा आणि गळ्याचा एक्स-रे काढून त्याच्यावर एन्डोस्कोपी सुरु केली. एका तासाच्या आत मुलाच्या घशातून मूर्ती बाहेर काढण्यात आली. (हेही वाचा: App च्या माध्यमातून मैत्री केल्यानंतर अपहरण, मध्य प्रदेशात जाऊन 50 हजार रुपयांना केली मुलीची विक्री)

घसा एक अतिशय जटिल रचना आहे ज्यात अन्न नलिका, श्वासनलिका आणि रक्तवाहिन्यांचा समावेश असतो. म्हणून डॉक्टरांनी मूर्ती पोटात ढकलली, त्या स्थितीत ती उलटी झाली आणि एंडोस्कोपीच्या सहाय्याने ती बाहेर काढली.