Sonia Gandhi | ( Photo Credits: inc.in)

राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) चिंतन शिबिरात पक्षाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी आपल्या भाषणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षाच्या वतीने काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रा (National Kanyakumari to Kashmir Bharat Jodo Yatra) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, गांधी जयंतीनिमित्त आम्ही 2 ऑक्टोबरपासून 'राष्ट्रीय कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा' सुरू करणार आहोत. यादरम्यान सर्व तरुण आणि नेते या प्रवासात सहभागी होणार आहेत.

सोनिया गांधींनी आपल्या छोटेखानी भाषणाच्या शेवटी 'आम्ही जिंकू', हा आमचा संकल्प आहे, असे तीनदा ठणकावून सांगितले. सोनिया गांधी म्हणाल्या की, या सत्राच्या शेवटच्या दिवशी मी माझ्या कुटुंबासोबत एक संध्याकाळ घालवली असे त्यांना वाटले. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, ‘राजकीय आव्हानांचा विचार करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांसाठी सल्लागार समिती स्थापन करेल. यासोबतच संघटना सुधारण्यासाठी टास्क फोर्सही तयार करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांपासून ते माझ्यासारखे ज्येष्ठ नेतेही या यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेमुळे लोकांमध्ये सामाजिक एकोपा वाढेल आणि संविधान जपण्यास मदत होईल.’

15 जूनपासून काँग्रेस जन जागरण अभियान सुरू करणार असल्याचेही सोनियांनी जाहीर केले. या अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तत्पूर्वी, आपल्या भाषणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ‘विचारधारा वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी जनतेत जावे लागेल, विचार न करता जनतेत बसले पाहिजे. त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात. आमचा जनतेशी असलेला संबंध पुन्हा निर्माण करावा लागेल. काँग्रेस पक्षच देशाला पुढे नेऊ शकतो, हेही लोकांना माहीत आहे.’ (हेही वाचा: Rakesh Tikait यांची Bharatiya Kisan Union मधून हकालपट्टी; शेतकरी नेत्यांनी केला राजकारण केल्याचा आरोप)

काँग्रेस नेते म्हणाले की, ‘सरकारने भारतातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. एकीकडे बेरोजगारी, दुसरीकडे महागाई, युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. याचा परिणाम आगामी काळात महागाईवर होणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यात संपूर्ण कॉंग्रेस पक्ष जनतेमध्ये उतरून प्रवास करेल, असा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला आहे. काँग्रेसचे जनतेशी जे नाते आहे, ते पुन्हा स्थापित होईल. हे कोणत्याही शॉर्टकटने होणार नाही आणि हे काम केवळ घाम गाळूनच होऊ शकते.’