भारतीय किसान युनियनशी (Bharatiya Kisan Union) संबंधित अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. येथील शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना भारतीय किसान युनियनमधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकैत यांचीही अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे.
बीकेयूचे संस्थापक दिवंगत चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीकेयूच्या नेत्यांची एक मोठी बैठक रविवार 15 मे रोजी लखनौ येथील ऊस शेतकरी संस्थेत पार पडली. त्यात टिकैत बंधूंच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आला. टिकैत कुटुंबाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेल्या या नाराजीनंतर भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत. (हेही वाचा - Sunil Jakhar Quits Congress: माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी)
भारतीय किसान युनियनचे अनेक सदस्य संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावर नाराज होते. राकेश टिकैत यांनी आपल्या राजकीय वक्तव्यांनी आपल्या अराजकीय संघटनेला राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप या शेतकरी नेत्यांनी केला आहे. बीकेयू नेत्यांच्या नाराजीची बातमी मिळताच राकेश टिकैतही शुक्रवारी रात्री लखनौला पोहोचले. मात्र, या प्रयत्नात त्यांना यश मिळू शकले नाही.
संतप्त शेतकरी नेत्यांचे नेतृत्व करणारे बीकेयूचे उपाध्यक्ष हरिनाम सिंग वर्मा यांच्या निवासस्थानी राकेश टिकैत संघटनेच्या असंतुष्ट नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यात यश न मिळाल्याने ते मुझफ्फरनगरला परतले.