उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur ) येथे चोरट्यांनी चक्क 10 फूट लांब बोगदा खणून तब्बल 1.8 किलो सोने लंपास (Kanpur SBI Theft News) केले आहे. ज्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 1 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या चोरीची देशभर चर्चा सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भानुती शाखेला लागून असलेल्या रिकाम्या भूखंडातून 10 फूट लांब आणि चार फूट रुंद बोगदा खणला, असे पोलिसानी सांगितले.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, चोरट्यांनी बोगदा खणून बँकेत प्रवेश मिळवला आणि त्यांनी सोने लंपास केले असले तरी, त्यांना 32 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली तिजोरी मात्र उघडता आली नाही. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत. परिसरातील नागरीक चोरट्यांनी खणलेला बोगदा पाहायला मिळावा म्हणून गर्दी करत आहेत. (हेही वाचा, SBI FD Rate Hike: ग्राहकांना 'एसबीआय'ची मोठी भेट; एफडी व्याजदरामध्ये भरघोस वाढ, जाणून घ्या नवे दर)
चोरी झालेल्या एकूण सोन्याची किंमत ठरविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना काही तासांचा कालवधी लागला. अखेर चहुबाजूंनी विचार आणि सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर बँकेतून एकूण 1.8 किलोपेक्षा अधिक वजनाचे सोने गेल्याचे अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही चहुबाजूंनी तपास सुरु केला आहे. आम्हाला संशय आहे की, हे कृत्य करण्यासाठी बँकेतीलच एखादा अधिकारी सहभागी असू शकतो. आम्हाला काही आरोपींचे बोटाचे ठसे आढळून आले आहेत. तसेच, वस्तूस्थितीजन्य पुरावेही आढळून आले आहेत. ज्यामुळे चोरीचा छडा लावण्यास आम्हाला मदत होऊ शकेल.
बीपी जोगदंड नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बँक अधिकाऱ्यांना आज सकाळी दरोडा पडल्याचे समजले. बँकेच्या अधिकाऱ्यांना तो बोगदा सापडला ज्याद्वारे चोर तिजोरीत आले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.