Kalicharan Maharaj यांचा माफी मागण्यास नकार, मृत्यूदंड स्विकारायला तयार; महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने FIR दाखल (Watch Video)
Kalicharan Maharaj (Photo Credits: IANS)

धर्म संसदेत महात्मा गांधींविरोधात (Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कालीचरण बाबांनी (Kalicharan Maharaj) एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘गांधींच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा पश्चाताप होत नाही, मी माफी मागणार नाही. यासाठी मृत्यूदंडाची शिक्षाही मान्य आहे.’ राजधानी रायपूरमध्ये रविवारी झालेल्या संसदेत महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून फरार झालेल्या कालीचरण बाबा यांनी सोमवारी एक व्हिडिओ जारी केला. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी आपली बाजू मांडली आहे, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपितांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे.

गांधीजींचा अपमान केल्याबद्दल माझ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही, मी माफी मागणार नाही, असे त्यांनी म्हटले. या व्हिडिओमध्ये पुढे त्यांनी म्हटले आहे की, गांधींमुळेच सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर आज भारत अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती बनू शकला असता. कालीचरण यांनी महात्मा गांधींवर घराणेशाहीचा पुरस्कार केल्याचा, भगतसिंग आणि राजगुरू यांची फाशी थांबवली नाही, असाही आरोप केला.

व्हिडिओमध्ये कालीचरण यांनी म्हटले की, कोणीही राष्ट्रपिता होऊ शकत नाही. राष्ट्रपिता बनवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, सरदार पटेल यांच्यासारखे लोक बनले पाहिजेत, ज्यांनी राष्ट्रकुल एकत्र करण्याचे काम केले. कालीचरण यांनी देशाच्या फाळणीसाठी गांधींना जबाबदार धरले. आता रायपूर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रकरणावर कालीचरण म्हणाले की, मला सत्य बोलल्याबद्दल फाशीची शिक्षा दिली गेली तरी मला ती मंजूर आहे. (हेही वाचा: राज्यात 10 हजार पोलिसांची भरती, वर्षभरात होणार प्रक्रिया पूर्ण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा)

दरम्यान, कालीचरण रायपूर सोडून गेल्याची बातमी येताच रविवारी रात्री रायपूरमध्ये कालीचरण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर आता रायपूर पोलीस कालीचरणचा शोध घेत आहेत. कालीचरण महाराष्ट्रात असल्याची बातमी आहे. धर्मसंसदेचे आयोजक आणि रायपूरच्या पोलिसांना कालीचरण सध्या कुठे आहेत, याची माहिती नाही. त्यांचा शोध सुरू आहे.