कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे देशात 23 मार्च पासून लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. या काळात अनेक व्यवसाय ठप्प झाल्याने लोकांना भविष्याची चिंता सतावू लागली आहे. अशात भारतातील सर्वात श्रीमंत हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक, आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) ट्रस्टने 1300 कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार हे सर्व कंत्राटी कामगार मंदिराच्या स्वच्छतेची काळजी घेत होते. या कर्मचार्यांचा करार 30 एप्रिल रोजी संपला व आता कोरोना व्हायरसच्या साथीमुळे या सर्वांना 1 मेपासून कामावर न येण्यास सांगण्यात आले आहे.
मंदिराकडून, कामगार मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या फर्मला कळविण्यात आले आहे की, 30 एप्रिल रोजी संपलेल्या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष वाई व्ही सुब्बा रेड्डी (Y V Subba Reddy) यांनी मुंबई मिररला सांगितले की, या काढून टाकलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रेड्डी यांनी सांगितले की, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या नियमित कर्मचार्यांनाही कोणतेही काम सोपविण्यात आले नाही. (हेही वाचा: एकेकाळी Coronavirus ची सर्वाधिक प्रकरणे असलेल्या केरळमध्ये आज नवीन एकही रुग्ण आढळला नाही; राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या फक्त 95 वर)
तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट हे विष्णू निवास, श्रीनिवासम आणि माधवम असे तीन अतिथीगृह चालविते. हे सर्व 1300 कर्मचारी याच ठिकाणी अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मात्र लॉक डाऊनमुळे सर्व गेस्टहाउस बंद पडले आहेत, त्यामुळे या कर्मचार्यांच्या कराराचा कालावधी वाढविण्यात आला नाही. चालू आर्थिक वर्षातील टीटीडीचे बजेट 3,309 कोटी रुपये आहे. फेब्रुवारी महिन्यात सेट केलेल्या प्रस्तावांमध्ये कोरोना व्हायरसच्या स्थितीमुळे अपडेट करावे लागले. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या वेळी पीडित कामगारांनी टीटीडी प्रशासनाला आपले काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, टीटीडी प्रशासन मॅन पॉवर फर्मबरोबरचा करार नूतनीकरण करण्यास तयार नाही.