असे म्हणतात की शिक्षणाला कोणतेही वय नसते, कोणीही कधीही शिक्षण घेऊ शकते. आता झारखंड (Jharkhand) मध्ये असेच एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो (Jagarnath Mahto) आता राज्यातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याबरोबरच स्वतः अभ्यासही करणार आहेत. होय, जगरनाथ महतो यांनी अकरावीत प्रवेश घेतला आहे. सोमवारी त्यांनी बोकारो जिल्ह्यातील बर्मो ब्लॉक अंतर्गत नवडीह येथील स्वतःच्या देवी महतो महाविद्यालयात (Devi Mahto Inter College) प्रवेश घेतला. झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सांगितले की, आता ते फक्त येथेच थांबणार नाहीत तर उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शिक्षणमंत्र्यांनी आर्ट स्ट्रीममध्ये प्रवेश घेतला आहे. प्रवेश घेतल्यानंतर महतो म्हणाले, 'आम्ही आता कॉलेजमध्येही जाऊ आणि मंत्रालयही सांभाळू व घरीदेखील शेतीची कामे करू, जेणेकरून इतर लोकांना माझ्याकडून प्रेरणा मिळेल. 11 वी मध्ये प्रवेश घेताना ते म्हणाले, ‘मानव संसाधन विकास मंत्री म्हणून काम करताना जेव्हा माझ्या क्षमतेवर प्रश्न उभे केले जातात तेव्हा मला खूप वाईट वाटते, कारण मी फक्त दहावी पास आहे. शिक्षण घेण्यास वयाची मर्यादा नाही. बरेच लोक इतर नोकरीमध्येही असून आयएएस आणि आयपीएसची तयारी करतात आणि यशस्वीही होतात.’ (हेही वाचा: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'आत्मनिर्भर भारत' सप्ताहाचे उद्घाटन)
एएनआय ट्वीट -
I am enrolling in class 11 now and will study hard. I was very offended when my capability of assuming the role of the HRD minister was questioned as I am still just a class 10 pass out: Jagarnath Mahto, HRD Minister, Jharkhand pic.twitter.com/a8kTCcU2YY
— ANI (@ANI) August 10, 2020
यासह त्यांनी माहिती दिली की, राज्यभरात 4,416 मॉडेल शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी आज त्यांनी ऑर्डरवर सही केली आहे. यामुळे राज्यात अधिक सुविधांसह चांगले शिक्षण मिळेल. दरम्यान, महतो हे झारखंडच्या मंत्रिमंडळात एकमेव मंत्री नाहीत ज्यांच्याकडे मॅट्रिकची पात्रता आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता, परिवहन मंत्री चंपाई सोरेन, समाजकल्याण मंत्री जोबा मांझी आणि कामगार मंत्री सत्यनंद भोकता यांनीही 2019 च्या झारखंड विधानसभा निवडणुकावेळी, आपल्या प्रतिज्ञापत्रात दहावी उत्तीर्ण असल्याची पात्रता जाहीर केली आहे.