HD Kumaraswamy (Photo Credit: ANI)

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी केलेल्या दाव्यामुळे कर्नाटक राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर देशाच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. कुमारस्वामी यांनी भाकीत करत म्हटले आहे की, कर्नाटक काँग्रेसमध्ये लवकरच दुफळी पाहायला मिळेल. इतकेच नव्हे तर त्या पक्षाचे बहुतांश आमदार भाजपसोबत हातमिळवणी करतील आणि कर्नाटकातील काँग्रेस सरकार (Karnataka Government) कोसळेल. एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे एका माजी मुख्यमंत्र्यांने केलेल्या भाकीताला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

'काँग्रेस पक्षातील 50-60 आमदार सत्तेतून बाहेर पडणार'

माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षातील 50-60 आमदार सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे म्हटले आहे. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारच्या सचोटीबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले "काँग्रेसचे एक मंत्री 50-60 काँग्रेस आमदारांचा गट घेऊन भाजपमध्ये सामील होऊ शकतात. कर्नाटक सरकार लवकरच पडू शकते. काहीही होऊ शकते. त्यांच्यात प्रामाणिकपणा आणि निष्ठा उरलेली नाही. काँग्रेसमधील फुटीरवादी नेत्याचे नाव सांगा, असा आग्रह प्रसारमाध्यमांनी धरताच ते म्हणाले की, केवळ "प्रभावशाली" व्यक्तीच असे पाऊल उचलू शकतात आणि लहान नेते अशी काही कृती करु शकत नाहीत. (हेही वाचा - Telangana CM Revanth Reddy यांनी विधानसभेमध्ये घेतली आमदारकीची शपथ (Watch Video))

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळला कुमारस्वामी यांचा दावा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी यांचा दावा फेटाळून लावला आहे. प्रत्युत्तरादाखल बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, भाजप आणि जेडी(एस) सरकार कोसळल्यामुळे ते भ्रमामध्ये होते. सत्तेतून जावे लागल्याने "भाजप आणि जेडी(एस) पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफडत आहेत. सत्ता गेल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सत्तेविना त्यांचा श्वास गुदमरतो आहे. वाजकांच्या माहितीसाठी असे की, आगामी लोकसभा निवडणूक 2024 ला सामोरे जाण्यासाठी आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी भाजप आणि जेडी(एस) ने अलीकडेच कर्नाटकमध्ये युती केली आहे. (हेही वाचा, Telangana CM Revanth Reddy यांनी विधानसभेमध्ये घेतली आमदारकीची शपथ (Watch Video))

 सिद्धरामय्या यांच्यावर "तुष्टीकरणाचे राजकारण" केल्याचा आरोप

काँग्रेस आणि जेडी(एस) यांच्यातील तणावाची ही पहिलीच घटना नाही. मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याक विभागासाठी निधी वाढवण्याची घोषणा केल्यानंतर गेल्या आठवड्यात कुमारस्वामी यांनी सिद्धरामय्या यांच्यावर "तुष्टीकरणाचे राजकारण" केल्याचा आरोप केला. प्रत्युत्तरात सिद्धरामय्या यांनी सांगितले की, आम्ही अल्पसंख्याक विभागासाठी 4,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कुमारस्वामी यांच्या कार्यकाळात राज्याचा विकास खुंटल्याचेही ते म्हणाले.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लक्षणीय विजयानंतर कुमारस्वामी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. अलिकडील काही काळात कुमारस्वामी यांनी काँग्रेसविरोधात टीकेची धार वाढवली आहे. तसेच, त्यांची विधाने भाजपसोबत युतीधर्म वाढविण्याच्या दृष्टीने अधिक जवळीक करणारी ठरत आहेत.