जम्मू काश्मीर(Jammu & Kashmir) येथील कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात वामपोरा (Wanpora) या छोट्या गावात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार केल्यावर आज सकाळी भारतीय सैन्याची स्थानिक तुकडी आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरु केले होते. सकाळपासून या ठिकाणी दोन्ही दलात चकमक सुरु होती. आताच्या ताज्या अपडेटनुसार, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना सैन्यदलाकडून कंठस्नान (2 Terrorist Killed) घालण्यात आले आहे. याठिकाणहून सैन्याने शस्त्र आणि दारुगोळा सुद्धा जप्त केला आहे, सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजतेय. याबाबत जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी 25 मे रोजी येथील कुलगाम जिल्ह्यातील मंझगाम भागात 34 राष्ट्रीय रायफल दल (आरआर), केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कुलगाम पोलिस यांनी एकत्रित रित्या हे ऑपरेशन करून 2 दहशतवाद्यांना ठार केले होते, यानंतर अवघ्या 4 दिवसात भारतीय सैन्याला पुन्हा एकदा मोठे यश आले आहे.
पहा ट्विट
Update.Both terrorists neutralised in the on going operation at #Wampora #Kulgam. https://t.co/rAVgpNW6u2
— J&K Police (@JmuKmrPolice) May 30, 2020
दरम्यान, मागील काही दिवसात जम्मू काश्मीर मधील दहशतवादी कारवाया वाढत आहेत. या कारवायांना भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख उत्तर दिले जातेय. अगदी अलीकडेच 16 मे रोजी सुद्धा जम्मू काश्मीर मधील बडगाम येथील अरिजाल खानसाहिब या परिसरात असणाऱ्या दहशतवादी तळाला उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आले होते. याठिकाणहून लश्कर-ए-तोयबा चा दहशतवादी जहूर वानी याला अटक करण्यात आली होती. यानंतर १९ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भारतीय सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीन या गटातील दोन दहशतवाद्यांना सैन्यातील जवानांनी गोळ्या घालून ठार केले होते.