COVID-19: मुंबई पाठोपाठ नवी दिल्लीतही मास्क घालणे बंधनकारक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आदेश
Delhi CM Arvind Kejriwal (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. या सूचनेची अंमलबजावणी होते न होते तोच नवी दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे हे गरजेचे आहे, यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येईल या उद्देशाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनीही नवी दिल्ली (New Delhi) मास्क लावणे अनिवार्य केले आहे. तसेच या मास्क मध्ये P-95 मास्क वा साधे कपड्याचे मास्क देखील चालतील असेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने मुंबई महानगरपालिकेने कठोर पावलं उचलत आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालून फिरणा-यांवर IPC कलम 188 च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यापाठोपाठ आता नवी दिल्लीतही मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. मास्क न घालता बाहेर पडणे हे नियमांचे उल्लंघन केल्याचे मानले जाईल असेही त्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा- मुंबई: सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून न फिरणा-यांवर कलम 188 अंतर्गत होणार कारवाई- BMC

भारतात कोरोना बाधितांची संख्या 5274 वर पोहचली आहे. तर 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 4714 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. लोकांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही तर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाने वर्तविली आहे.

महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढतच आहे. आज घडीला, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत 60 ने वाढ झाली असून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 1078 वर पोहचला आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यातील 44 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पुणे येथे 9, नागपुर मध्ये 4, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.