International Passenger Flights: आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढली; वाढत्या Covid-19 संसर्गामुळे DGCA चा मोठा निर्णय
Representational image. (Photo Credits: Pexels)

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील (International Passenger Flight) बंदी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवली आहे. शुक्रवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात असे म्हटले आहे की, सर्व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक ऑपरेशन्सवर आणि विशेषतः डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाइट्सवर ही बंदी लागू होणार नाही. डीजीसीएने सांगितले की इतर विमानांवरील ही बंदी 31 ऑगस्ट रोजी रात्री 11.59 पर्यंत लागू राहील. भारतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी 31 जुलै रोजी संपत होती. यापूर्वी DGCA ने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लादलेली बंदी 31 जुलै पर्यंत वाढवली होती.

डीजीसीएने जारी केलेल्या नवीन परिपत्रकात असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी वाढवण्याच्या निर्णयाचा मालवाहू विमानांवर परिणाम होणार नाही. कोरोना महामारीमुळे भारतात 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. मे 2020 पासून वंदे भारत अभियान आणि जुलै 2020 पासून विशेष आंतरराष्ट्रीय विमाने निवडक देशांमध्ये ‘एयर बबल’ व्यवस्थेअंतर्गत विशेष उड्डाण करत आहेत.

अमेरिका, यूके, युएई, केनिया, भूतान आणि फ्रान्स यासह अनेक देशांशी भारताचे 'एअर बबल' करार आहेत. याअंतर्गत एअरलाईन कंपन्या दोन देशांमध्ये विमान चालवू शकतात. आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निलंबन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: Oil India Recruitment 2021: ऑइल इंडिया लिमिटेड मध्य नोकर भरती, येत्या 16 ऑगस्टपासून 115 पदांसाठी होणार वॉक-इन इंटरव्यू)

दरम्यान, गेल्या वर्षभरात देशव्यापी लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीतून भारतीय उड्डाण उद्योग अजूनही सावरत आहे. एप्रिलमध्ये महामारीची दुसरी लाट देशात आली, ज्यामुळे देशभरातील हवाई वाहतूक पुन्हा कमी झाली, विशेषत: जेव्हा इतर देशांनी भारताकडे जाणाऱ्या विमानांवर बंदी घातली तेव्हा विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या, भारतातील कोरोना प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरू आहे.