
दक्षिण चीन समुद्र आणि हिंद प्रशांत महासागराच्या पुर्वेकडील ताफ्याच्या कार्यचालन तैनातीअंतर्गत, भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या स्टील फ्रिगेट प्रकारातल्या आयएनएस सह्याद्री जहाज 2 ऑक्टोबर 2025 रोजी केमानन बंदरावर तैनात करण्यात आले. मलेशियाच्या रॉयल नौदलाने, उभय राष्ट्रांमधील स्थायी सांस्कृतिक संबंध आणि सामायिक सागरी परंपरा जपत जहाजाचे स्वागत केले. स्वदेशी पद्धतीने आरेखित करून बांधण्यात आलेले आणि 2012मध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आयएनएस सह्याद्री हे शिवालिक श्रेणीतील गाइडेड मिसाईल स्टेल्थ फ्रिगेटसपैकी तिसरे जहाज आहे. हे जहाज 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाचे लखलखीत उदाहरण आहे आणि अनेक द्विपक्षीय आणि बहुस्तरीय सराव आणि तैनातींमध्ये त्याचा सहभाग होता.
आयएनएस सह्याद्रीचा हा तिसरा मलेशिया दौरा आहे. यापुर्वी 2016मध्ये सदिच्छा मोहिमेअंतर्गत क्लांग बंदराला भेट दिली होती आणि त्यानंतर 'समुद्र लक्ष्मण' या सरावात सहभागी होण्यासाठी 2019 मध्ये कोटा किनाबालु इथंही सहभागी झाले होते. या भेटींमुळे परस्पर देशांतील भक्कम आणि विकसित होत असलेले नौदल संबंध अधोरेखित करतात. दक्षिण चीन समुद्र आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात सातत्याने तैनात होणारे आयएनएस सह्याद्री, हे हिंद-प्रशांत सागरी क्षेत्रातील जबाबदार सागरी भागीदार आणि प्राधान्यक्रम असणारा सुरक्षा भागीदार म्हणून भारताची प्रतिष्ठा अधोरेखित करते. भारत - मलेशिया सागरी लष्करी सहकार्य, दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि सर्वोत्तम नौदल पद्धतींची देवाणघेवाण हा केनानम बंदरावर जहाज तैनात कऱण्याचा उद्देश आहे. तीन दिवसांच्या या भेटीदरम्यान जहाजाच्या कमांडिग अधिकाऱ्याने रॉयल मलेशियन नौदल अधिकाऱ्यांच्या सौजन्य भेटी घेतल्या. त्यामध्ये नौदल क्षेत्राचे उपकमांडर फर्स्ट अॅडमिरल अब्द हलीम बिन कमरुद्दीन यांच्या भेटीचाही समावेश होता.
या भेटीदरम्यान व्यावसायिक देवाणघेवाण, भारतीय नौदल आणि मलेशियन नौदल अधिकाऱ्यांच्या भेटी, परस्पर प्रशिक्षण, क्रीडा सामने तसेच आयएनएस सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांच्या मनोरंजन भेटींचा समावेश होता. भारतीय नौदलाच्या कल्याण, करुणा आणि भारत-मलेशिया मैत्री भक्कम करण्याच्या वचनबद्धता प्रतिबिंबित करणाऱ्या योग सत्र तसेच धर्मादाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान समृद्ध आणि बहुआयामी संबंध आहेत, जे गेली अनेक वर्षांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंधांमधून आकाराला येत आहेत. भूराजकीय सागरी क्षेत्रामधील हिंद प्रशांत महासागराचे वाढते महत्त्व लक्षात घेता, उभय राष्ट्रांनी परस्पर हितसंबंधांवर आधारित प्रादेशिक भागीदारी निर्माण करण्याचे महत्त्व अधिकाधिक ओळखले आहे. भारताचा महासागर उपक्रम आणि मलेशियाचे आसियान देशांच्या हिंद प्रशांत महासागरासंबंधी असणारा दृष्टीकोनाशी असलेला संबंध, दोन्ही राष्ट्रांना सागरी समन्वयाद्वारे समृद्धी प्रदान करतो आहे.
भारत आणि मलेशिया यांच्या नौदलातील परस्पर संवादांमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाल्याचे दिसते. भारतीय नौदल आणि मलेशियाच्या नौदल यांच्या जहाजांदरम्यान 2024 मध्ये झालेल्या क्षेत्र प्रशिक्षण सराव 'समुद्र लक्ष्मण' च्या तिसऱ्या आवृत्तीचा यशस्वी समारोप, या प्रदेशात सागरी सुरक्षा आणि सहकार्य वृद्धिंगत कऱण्याच्या दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.