Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 9152; मागील 24 तासांमध्ये 35 जण Covid 19 चे बळी
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आज (13 एप्रिल) कोरोनाबाधितांचा आकडा 9000 च्या पार गेला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज कोरोनाबाधितांचा आकडा 9152 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या 7987 लोकांवर देशाभरात सरकारी आणि खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर 856 लोकं कोरोनामुक्त देखील झाले आहे. त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. तर कोरोनामुळे भारतामध्ये बळी गेलेल्यांची संख्या 308 पर्यंत पोहचली आहे. मागील 24 तासांमध्ये 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतामध्ये कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी 24 मार्च दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानुसार 14 एप्रिल पर्यंत भारतामध्ये लॉकडाऊन असेल. मात्र महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब या राज्यांनी दिवसागणिक कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन पुढे 16 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही राज्यांमध्ये तो 30 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबई: लालबाग मधील गणेश गल्ली परिसर 'Containment Area' म्हणून BMC ने केला घोषित.  

भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1982 पर्यंत पोहचला आहे. मुंबई शहर हे अग्रस्थानी असल्याने आता लॉकडाऊन अधिक कडक करत कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

ANI Tweet

कोरोनावर अद्याप ठोस लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने पर्यायी औषधांचा वापर करून त्यावर उपचार केले जात आहे. लवकरच प्लाझ्मा थेरपीचा वापर करून अधिकाधिक कोरोनाग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.