काँग्रेसचे (Congress) सर्वोच्च नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (D K Shivakumar) हे देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. ते देशातील सर्वात श्रीमंत आमदार (India’s Richest MLA) आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार निर्मल कुमार धारा हे सर्वात गरीब आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता फक्त रु.1700 आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW)च्या अहवालानुसार, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे 1,413 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. 2023 मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवकुमार यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे एकूण 273 कोटी रुपयांची स्थावर आणि 1,140 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
विशेष म्हणजे, टॉप 20 श्रीमंत आमदारांपैकी 12 सर्वोच्च पदे कर्नाटकातील आमदारांकडे आहेत. एडीआरच्या अहवालात असे दिसून आले आहे की, कर्नाटकातील 14 टक्के आमदार अब्जाधीश आहेत, त्यांची संपत्ती प्रत्येकी 100 कोटी किंवा त्याहून अधिक आहे. कर्नाटकातील आमदारांची सरासरी मालमत्ता 64.3 कोटी रुपये आहे. (हेही वाचा: World's Most Affordable Pizza: भारतातील महागाईचा सामना करण्यासाठी Domino's ने सादर केला 'जगातील सर्वात परवडणारा पिझ्झा'; जाणून घ्या किंमत)
अपक्ष आमदार आणि उद्योगपती केएच पुट्टास्वामी गौडा 1,267 कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंत आमदारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक विधानसभेतील काँग्रेसचे सर्वात तरुण आमदार प्रियकृष्ण आहेत, ज्यांचे वय 39 वर्षे आहे. त्यांच्याकडे 1,156 कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रियकृष्ण यांचे वडील एम कृष्णप्पा यांचे कर्नाटकातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत 18 वे स्थान आहे. खाण उद्योगपती गली जनार्दन रेड्डी या यादीत 23 व्या क्रमांकावर आहेत.
देशातील 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 4,001 विद्यमान आमदारांचा समावेश असलेला हा अहवाल देशभरातील राजकारण्यांच्या आर्थिक बाबींवर प्रकाश टाकतो. अहवालानुसार, पश्चिम बंगालमधील सिंधू मतदारसंघातील निर्मल कुमार धारा हे सर्वात गरीब आमदार आहेत, ज्यांची संपत्ती फक्त 1,700 रुपये आहे. निर्मल कुमार हे भाजपचे आमदार आहेत. याआधी 2021 मध्ये ते टीएमसीच्या गढ सिंधू जागेवरून टीएमसी उमेदवार रुणू मेटे यांचा पराभव करून आमदार म्हणून निवडून आले आहेत.