Pizza

झपाट्याने वाढणाऱ्या महागाईचा (Inflation) परिणाम आता लोकांच्या फास्ट फूडच्या आवडी-निवडीवर दिसू लागला आहे. आजकाल लोक फास्ट फूडवर खर्च करताना विचार करत असल्याचे दिसत आहे. या वाढत्या महागाईतही लोकांना त्यांच्या आवडत्या स्नॅक्सचा आस्वाद घेता यावा यासाठी जगातील एक मोठी पिझ्झा कंपनी डॉमिनोजने (Domino's) जगातील सर्वात स्वस्त पिझ्झा (World's Most Affordable Pizza) आणला आहे.

या सर्वात स्वस्त डोमिनोज पिझ्झाची किंमत फक्त 49 रुपये आहे. अमेरिकेबाहेर भारत ही डॉमिनोची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील कंपनीच्या फ्रँचायझीच्या सीईओच्या मते, सतत वाढणाऱ्या महागाईमुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. म्हणूनच भारतातील महागाईचा सामना करण्यासाठी डॉमिनोजने सादर केला आहे जगातील सर्वात परवडणारा पिझ्झा.

डोमिनोजच्या सर्वात स्वस्त पिझ्झाचा आकार सात इंच आहे. भारतातील डॉमिनोज फ्रँचायझीच्या सीईओने सांगितले की, तुम्हाला फक्त 49 रुपयांमध्ये स्टोअरमध्ये हा पिझ्झा मिळेल. सर्वच बाबतीत किमती प्रचंड वाढल्याने ग्राहकांचा फास्ट फूडकडील ओढा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे डॉमिनोजने त्यांच्या ग्राहकांना शक्य तितक्या स्वस्त पिझ्झा देऊ करण्याचा विचार केला. चीनमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या शांघायमधील सर्वात स्वस्त डोमिनोज पिझ्झा हा $ 3.80 ला आहे आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील सर्वात स्वस्त पिझ्झा $12 ला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतामधील वाढत्या महागाईने डोमिनोज, पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या फास्ट फूड ब्रँड्सना त्यांची रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. या कंपन्या त्यांचा बाजारातील हिस्सा कायम ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक नवीन योजना अवलंबत आहेत. भारतासारख्या देशात जिथे फास्ट फूड असलेल्या समोसाची किंमत फक्त 10 रुपये आहे, तिथे अशा मोठ्या फूड ब्रँड्सना टिकून राहणे अवघड झाले आहे. (हेही वाचा: World's Best Street Sweets: भारतातील म्हैसूर पाक, कुल्फी आणि कुल्फी फालुदाचा जगातील टॉप-50 स्ट्रीट फूड स्वीट्समध्ये समावेश, जाणून घ्या यादी)

फक्त डोमिनोज हा एकमेव ब्रँड नाही ज्याने भारतात त्याच्या किमती कमी केल्या आहेत, पिझ्झा हटनेही गेल्या वर्षी 79 रुपयांपासून पिझ्झा लाँच केला होता. पिझ्झा हट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मेरिल परेरा म्हणाले की, पिझ्झा हटला अशी उत्पादने सादर करायची आहेत, ज्यांचा भारतातील ग्राहक परवडणाऱ्या किमतीत आनंद घेऊ शकतील. पिझ्झा हट व्यतिरिक्त, मॅकडोनाल्डने जूनमध्ये अर्ध्या किमतीचे जेवण देखील लॉन्च केले आहे.