भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक आनंदाची बातमी आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढू शकते. हा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने (Morgan Stanley) वर्तवला आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या विश्लेषकांच्या मते, 2022-23 मध्ये भारताची अर्थव्यवस्था आशियात सर्वात जलद गतीने वाढण्याची आणि सर्वात मजबूत होण्याची शक्यता आहे. मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी सरासरी 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो आशियातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असेल.
अहवालात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था येत्या दशकात सर्वोत्तम कामगिरी करणार आहे आणि या काळात मागणी देखील वाढणार आहे. मॉर्गन स्टॅनलीचे मुख्य आशिया अर्थशास्त्रज्ञ चेतन अह्या यांनी एका नोटमध्ये लिहिले की, ‘आम्ही भारताच्या दृष्टिकोनाबद्दल अत्यंत सकारात्मक आहोत. अलीकडील डेटा आम्हाला विश्वास देतो की देशांतर्गत मागणीसाठी भारत चांगल्या स्थितीत आहे, जे महत्वाचे असेल.’
ते पुढे म्हणाले की, ‘धोरणकर्त्यांनी नव्या सुधारणांची मालिका सुरू केली आहे, ज्यामुळे खाजगी भांडवली खर्च वाढण्यास मदत होईल. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे, वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत त्यामुळे मागणी वाढली आहे.’ दरम्यान, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारतीचा जीडीपी आर्थिक वर्ष 2022 मध्ये 7.4 आणि 2023 मध्ये 6.1 असण्याची अपेक्षा आहे, जी अमेरिका, युरो क्षेत्र, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, जपान आणि युनायटेड किंगडम सारख्या इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच चांगली आहे. (हेही वाचा: American Dollar च्या तुलनेत Rupee 36 पैशांनी घसरून 79.61 वर झाला बंद)
ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ग्रोथ प्रोजेक्शनमध्ये 2021 मध्ये भारत एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. 2021 मधील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताचा जीडीपी 8.7 वर पोहोचला आहे, जे दर्शवते की भारताची स्थिती इतर विकसित देशांपेक्षा चांगली आहे.