भारतात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 60.73 टक्क्यांवर पोहचला, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांची माहिती
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांनी 6 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी अशी अपेक्षा केली जात आहे. तर कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून आहोरात्र उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे आता भारतात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 60.73 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही आहे. परंतु तरीही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्याचसोबत प्लाझ्मा थेरपीचा सुद्धा आता कोरोनाग्रस्तांवर उपचाराला यश येत आहे. तर भारतात रिकव्हरी होण्याचा कोरोनाबाधितांमधील रेट 60 टक्यांच्या पार गेला असल्याची ही माहिती देण्यात आली आहे.(COVID-19 Vaccine: भारतामध्ये COVAXIN पाठोपाठ Zydus Cadila ला देखील मानवी चाचणी साठी परवानगी)

दरम्यान,  गुरुवारी आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार देशात 20,903 नवे रुग्ण आढळले असून 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,27,439 अॅक्टीव्ह केसेस आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 3,79,892 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. दरम्यान कोविड-19 ची बाधा झाल्यामुळे एकूण 18213 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे देशात लॉकडाऊन लागू करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अनलॉकच्या प्रक्रियेनुसार हळूहळू काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी सरकारकडून आता देण्यात आली आहे.