Coronavirus In India | Photo Credits: Pixabay.com

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्णांची संख्या पाहता देशातील परिस्थिती गंभीर बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत भारतात (India) 8171 नवे रुग्ण आढळले असून 204 नवे कोरोना संक्रमित रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,98,706 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 5598 इतकी झाली आहे. सद्य घडीला देशात 97,581 रुग्ण उपचार घेत असून 95,527 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

देशात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या धक्कादायक असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असून आतापर्यंत एकूण 70,013 रुग्ण राज्यात आढळले आहेत.

महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडूत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, भारतात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्र्र, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात आढळून आला आहे. यानुसार देशात विविध कंटेनमेंट आणि रेड झोन्स घोषित करण्यात आले आहेत. या झोन्सला वगळून आज पासून सुरु होणाऱ्या लॉक डाऊन च्या पाचच्या टप्प्यात देशातील विविध व्यवसाय उद्योग सुरु करण्यात येणार आहेत.

कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर देशातील कटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनमध्ये 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून कन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री 9 ते 5 या दरम्यान नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.