Coronavirus in India: भारतात कोविड-19 चे थैमान! आज सर्वाधिक मृतांची नोंद
Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे (Coronavirus Second Wave) थैमान सुरु आहे. मागील 24 तासांत सर्वाधिक मृतांची नोंद झाली असून नव्या कोरोना रुग्णांची संख्या 4 लाखांच्या पार गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, आज तब्बल 4,187 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4,01,078 नव्या कोविड रुग्णांची भर पडली आहे. 3,18,609 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या वाढीनंतर देशातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 2,18,92,676 झाली असून मृतांचा आकडा 2,38,270  वर पोहचला आहे. देशात 1,79,30,960 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 37,23,446 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, 16,73,46,544 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. (सरकारचा मोठा निर्णय! ब्रिटनला जाणारे Covishield लसीचे 50 लाख डोस भारतात वापरण्यात येणार)

देशात वाढणारी रुग्णसंख्या नक्कीच चिंताजनक असून मृतांचा आकडाही वाढत आहे. यातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे नागरिकांपुढील समस्येत वाढ होत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. दरम्यान, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

ANI Tweet:

कोविड-19 सोबतच अधिकाधिक लोक आर्थिक विवंचनेतही अडकले आहेत. यामुळे नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर सगळ्यावर मात करण्यासाठी लसीकरणाचा एकच मार्ग असल्याचे तज्ञांचे मत आहे.