सरकारचा मोठा निर्णय! ब्रिटनला जाणारे Covishield लसीचे 50 लाख डोस भारतात वापरण्यात येणार
Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

ब्रिटनला पाठविल्या जाणार्‍या कोविशिल्ड (Covishield) च्या 5 दशलक्ष डोसचा उपयोग आता भारतात 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी केला जाणार आहे. अधिकृत सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सीरम संस्थेचे शासकीय व नियामक कार्य संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी आरोग्य मंत्रालयाला यासंदर्भात परवानगी मागण्यासाठी पत्र लिहिले आहे. यावर, केंद्र सरकारने 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे डोस देण्याचे ठरविले आहे.

23 मार्च रोजी सीरम संस्थेने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर झालेल्या कराराखाली मंत्रालयाकडे 50 दशलक्ष डोस ब्रिटनला पाठविण्याची परवानगी मागितली होती. यानंतर संस्थेने म्हटलं होतं की, यामुळे भारतात सुरू असलेल्या लसीकरणावर परिणाम होऊ देणार नाही. अधिकृत सुत्रांनी सांगितले की, भारतात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता या लसींचा वापर भारतात केला जाईल. (वाचा - Coronavirus in India: भारतात कोरोनाचे तांडव! मागील 24 तासांत आढळले 4,01,078 नवे कोविड रुग्ण)

मंत्रालयाने राज्यांना कंपनीशी संपर्क साधून लस खरेदी करण्यास सांगितले आहे. संसर्गाची स्थिती पाहता या 50 लाख डोसपैकी काही राज्यांना साडेतीन लाख, काहींना एक लाख आणि काहींना 50 हजार डोसचे वाटप करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, देशात आतापर्यंत कोरोना विरोधी लसीची 16.71 कोटी डोस लागू करण्यात आले आहेत. यामध्ये लसीकरण मोहिमेच्या 112 व्या दिवशी शुक्रवारी 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 21.27 लाख डोसचा समावेश आहे. यापैकी 18-44 वर्षे वयोगटातील 2.96 लाख लोकांना प्रथम डोस देण्यात आला. आतापर्यंत 16 कोटी 71 लाख 64 हजार डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांपैकी 45 ते 60 वयोगटातील 5.46 कोटी लोकांना प्रथम डोस आणि 58.29 लाखांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5.34 कोटी लोकांना प्रथम आणि 1.42 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.