Coronavirus: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा; भारतातील सर्व टोल प्लाझावरील टोल वसुलीस तात्पुरती स्थगिती
Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

देशावरील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. केंद्र सरकारने वेळीच पावले उचलून सध्या देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन घोषित केले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गोष्टी आणि वाहनेच चालू राहणार आहेत. अशात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री (Minister of Road Transport & Highways) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठा निर्णय घेत, भारतातील सर्व टोल प्लाझावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले आहे. सध्या देशातील कोरोना विषाणू परिस्थितीचा विचार करता हा निणर्य घेतला गेला आहे.

एएनआय ट्वीट -

सध्या देशात पूर्णपणे संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच चालू राहणार आहेत. विविध ऑफिसेसमध्ये फक्त 5 टक्केच कर्मचारी उपस्थित असणार आहेत. अशा काळात टोल नाक्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यास वेळ लागत आहे. तसेच या सेवांमध्ये असणाऱ्या अनेक लोकांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून देशातील टोल नाक्यावरील टोल वसुली काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा: केरळमध्ये Coronavirus रुग्णावर Anti-HIV औषधे वापरून यशस्वी उपचार)

टोल वसुली बंद झाली असली तरी, रस्त्यांचे दुरुस्तीचे काम तसेच चालू राहील. टोल नाक्यांवरील सर्व सेवा यादरम्यान सुरू राहतील, ही टोल वसुली काही काळाकरीता थांबवण्यात आली आहे, असेही नितीन गडकरींनी स्पष्ट केले. दरम्यान, आज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सध्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी ही 606 वर पोहचली आहे. यामध्ये 563 भारतीय नागरिक आणि 43 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे.