अंधश्रद्धेचा कळस! दिव्यांग मुलांना ग्रहणकाळात जमिनीखाली पुरले; 4 वर्षांची मुलगी बेशुद्ध
दिव्यांग मुलांना जमिनीखाली पुरले (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशात अनेक ठिकाणी आज सूर्यग्रहण (Solar Eclipse) पहिले गेले. काही पालकांनी आपल्या मुलांना वर्षाच्या शेवटच्या सूर्यग्रहणाची झलक पाहण्यास खास चष्मा दिला. तर कर्नाटकातील (Karnataka) कलबुर्गी (Kalaburgi) येथील काही पालकांनी, आपल्या दिव्यांग (Divyang) मुलांना चक्क शेण आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गळ्यापर्यंत पुरले. कलबुर्गी जिल्ह्याच्या हद्दीतील ताज सुलतानपूर येथे ही घटना घडली. पालकांचा असा विश्वास आहे की ग्रहणकाळात दिव्यांग मुलांना शेण व मातीच्याखाली पुरले तर मुले बरी होतील. स्थानिक कार्यकर्त्यांनी जेव्हा या मुलांना वाचवले तेव्हा चार वर्षांची मुलगी बेशुद्ध पडली असल्याचे निदर्शनास आले.

21 व्या शतकातही देशात अशा प्रकारची अंधश्रध्दा पाळली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, जनवादी महिला संघटनेत काम करणार्‍या अश्विनी मदनकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने या मुलांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यामध्ये तीन मुले होती, ज्यामध्ये एक 4 वर्षांची मुलगी असून ती एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊही शकत नाही. इतर दोन मुले आठ व अकरा वर्षाची होती. जेव्हा मुलांना बाहेर काढले तेव्हा 4 वर्षांची मुलगी बेशुद्ध पडली होती. (हेही वाचा: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार; गुप्तधन मिळावे म्हणून सुशिक्षित कुटुंबाने दोन महिने सुनेला ठेवले उपाशी)

कार्यकर्त्यांनी पालकांना ही गोष्ट पूर्णतः अंधश्रद्धा असल्याचे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा या पालकांवर काही फरक पडला असेल असे दिसत नाही. या मुलांचेआई-वडील गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना दिवसाचे दोन वेळेचे जेवण मिळणे मुश्कील आहे. तरी त्यांनी मुलांच्या उपचारावर बराच पैसा खर्च केला मात्र काही फरक पडला नाही. त्यानंतर फक्त आशेपोटी त्यांनी हे पाऊल उचलले. यामागे मुलांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असेही त्यांनी सांगितले.