IIT-BHU Case Accuse Arrested: आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, तिघांना अटक; आरोपी भाजपशी संबंधीत
Arrest | Pixabay.com

वाराणसी येथील संस्थेच्या बाहेर दोन महिन्यांपूर्वी आयआयटी-बीएचयू (IIT-BHU Student Molestation Case) विद्यार्थिनीच्या कथित विनयभंगाच्या प्रकरणी तिघांना रविवारी (31 डिसेंबर) अटक करण्यात आली आहे. हे तिघेही सत्ताधारी भारतीय जनता (BJP) पक्षाशी संबंधित आहेत. 2 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे IIT-BHU मधील विद्यार्थ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आरोपी भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत.

घटनेबाबत प्राप्त तपशील असा की, वाराणसीतील IIT-बनारस हिंदू विद्यापीठातील पीडित विद्यार्थिनीचा 2 नोव्हेंबरच्या पहाटे कॅम्पसमध्ये दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी विनयभंग केल्याची तक्रार आहे. या घटनेमुळे संताप निर्माण झाला आणि IIT-BHU विद्यार्थी संघटनेने सतत निदर्शने केली. आंदोलकांनी न्याय मागितला आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कॅम्पसमध्ये सुरक्षा उपाय वाढवण्यात यावेत अशी मागणी केली. (हेही वाचा, Mumbai Police: हत्येच्या गुन्ह्यात फरार, आरोपीला 31 वर्षांनंतर नालासोपारा येथून अटक)

कुणाल पांडे, आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. तिघांनाही वाराणसी येथून अटक करण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, आरोपींचा बनारस हिंदू विद्यापीठाशी कोणताही शैक्षणिक संबंध नाही. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर आरोप केला की, अटक करण्यात आलेले लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून या प्रकरणात वापरलेली मोटरसायकल आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध सक्षम पुरावे जमा केले आहेत. अखिलेश यादव यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. (हेही वाचा, Nagpur Crime News: भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नागपूर येथील घटना)

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता तिच्या मैत्रिणीसोबत वसतिगृहाबाहेर गेली असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी तिला बळजबरीने एका कोपऱ्यात नेले करमन बाबा मंदिराजवळ तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिला विवस्त्र केले आणि तिच्यावर बलात्कार करुन तिचा व्हिडिओही बनवला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आयपीसीच्या कलम 354 (तिच्या विनयभंगाच्या उद्देशाने महिलेवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि लंका पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सदर प्रकरणावरुन राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागल्याने सध्या हे प्रकरण प्रसारणमाध्यमामध्येही चर्चेत आहे. विद्यार्थी संघटनांनीही या घटनेचा निषेध केला आहे.