'स्त्रीने मासिक पाळीत स्वयंपाक केल्यास तिला कुत्री म्हणून पुनर्जन्म मिळेल'; स्वामी कृष्ण स्वरूप यांचे वादग्रस्त विधान
Swami Krishnaswarup Dasji (Photo Credits: Screengrab/Youtube)

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील संत स्वामी कृष्ण स्वरूप (Swami Krushnaswarup Dasji) यांनी मासिक पाळीबद्दल (Menstruation) वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, 'महिलांनी मासिक पाळी चालू असताना बनवलेले अन्न खाल्ल्यास पुरुषाचा दुसरा जन्म हा बैलाच्या रूपाने होईल.' सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी स्वामी कृष्णा आपल्या अनुयायांना संबोधित करताना म्हणाले की, ही गोष्ट जरी कडवी वाटत असली तरी हे सत्य आहे. स्वामीनाथन मंदिरात अशा प्रकारचे प्रवचन देण्यात आले आहे.

कृष्णस्वरूप पुढे म्हणाले की, 'संत याविषयी सांगण्यास नकार देतात, पण हे सांगितले नाही तर ते कसे कळेल? महिलांनी पीरियड्स दरम्यान स्वयंपाकघरातून दूर रहावे, अन्यथा नरकात जाण्यासाठी त्यांनी तयार राहिले पाहिजे.' त्याचबरोबर त्यांनी असा दावा देखील केला आहे की, जर एखाद्या महिलेने आपल्या मासिक पाळीच्या काळात आपल्या पतीसाठी स्वयंपाक केला, तर तिला निश्चितपणे कुत्री (Bitch) म्हणून पुनर्जन्म मिळेल.'

अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, स्वामींनी पुरुषांना सांगितले की, 'जर तुम्ही मासिक पाळी चालू असलेल्या एखाद्या महिलेचे हस्तनिर्मित भोजन खाल, तर तुम्हीसुद्धा दोषी आहात. या गोष्टी शास्त्रात स्पष्टपणे लिहिल्या आहेत. लग्नाआधी आपल्याला अन्न कसे खावे हे माहित असले पाहिजे.' धर्मग्रंथांचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, 'तुला जे उचित वाटेल ते तू करशील पण हे सारे शास्त्रात लिहिले आहे.' सध्या स्वामी कृष्णस्वरूप यांच्या या प्रवचनाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासंदर्भात स्वामीनारायण भुज मंदिराचे विश्वस्त व व्यावसायिक यादवजी गोरसिया यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा: भूज मधील मुलींच्या कॉलेजमध्ये वसतिगृहाच्या वॉर्डनच्या तक्रारीवरून मुलींची अंतवस्त्र उतरवली; मासिकपाळी दरम्यान मंदिर आणि किचनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप)

दरम्यान, सोमवारी पोलिसांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह, चार जणांना अटक केली. एका आठवड्यापूर्वी 60 हून अधिक महिला विद्यार्थ्यांना मासिक पाळी चालू आहे का नाही हे पाहण्यासाठी त्यांचे कपडे उतरवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ही घटना 11 फेब्रुवारीला एसएसजीआय कॅम्पसमध्ये वसतिगृहात घडली होती. ही संस्था भुजचे स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट चालवत आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 355 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात आता स्वामी कृष्णा स्वरूप यांच्या विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे.