Hyderabad Murder Case (Photo Credits-ANI)

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील (Hyderabad Rape Case) चार आरोपी चकमकीत ठार झाल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आरोपी चेन्नाकेशवुलू याच्या पत्नीशी माध्यमाने संवाद साधला असताना, तिने, "जिथे माझे पती मारले गेले तेथे मला घेऊन जा आणि मलाही ठार मारा" अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे. तर सोबतच, आरिफ या दुसर्या आरोपीच्या वडिलांनी "माझ्या मुलाने जर गुन्हा केला असेल, तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती मात्र ती शिक्षा अशा पद्धतीने मिळणे गैर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.तसेच, बरेच लोक बलात्कार करतात आणि खून करतात पण अशा प्रकारे त्यांची हत्या केली जात नाही, असे म्हणत त्यांना अशी वागणूक का दिली जात नाही? असा सवालही मृत आरोपींच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

Hyderabad Encounter: स्वसंरक्षणातून एनकाऊंटर; सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांची माहिती

आरोपी चेन्नाकेशावुलू आणि पत्नी रेणुका यांच्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे, एक स्त्री म्ह्णून तुम्ही पतीला पाठीशी न घालता या एन्काउंटरचे समर्थन करायला हवे असा सल्ला नेटकरी देताना दिसत आहे तर, लग्नाला अवघे एक वर्षच झाले असताना पतीच्या निधनाने "आता माझ्याकडे जगण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे मला सुद्धा मारून टाका अशा शब्दात रेणुकाने आपली हतबलता व्यक्त केली आहे. याशिवाय जेव्हा आरोपी म्ह्णून चेन्नाकेशावुलू याला पोलिसांनी नेले तेव्हा त्याला काही होणार नाही, आणि तो लवकरच घरी परत येईल असे सांगण्यात आल्याचेही ती म्हणाली.

कोण होते हे चार आरोपी

तेलंगणच्या नारायणपेठ येथे राहणारा आरिफ ट्रक चालक होण्यापूर्वी पेट्रोल पंपावर काम करत होता. जोलु शिव आणि जोलु नवीन गुढीगंदला हे गावचे रहिवासी होते आणि सफाई कामगार म्हणून काम करत होते. तर चौथा आरोपी चेन्नकेशुलुही याच गावातला होता. तोही ट्रक चालक होता लोकांनी सांगितले. हे चौघेही आरोपी गरीब कुटुंबातील आहेत आणि ते चांगले शिकलेले देखील आहेत. त्यांचे राहणीमान नेहमीच महाग कपडे आणि वस्तू वापरल्याने वेगळे दिसून यायचे. असे स्थानिक लोकांनी माहिती देताना सांगितले. मात्र, हे सर्व जण व्यसनी होते आणि कमावलेले पैसे पिण्याखाणे आणि इतर गोष्टींवर उधळत असत असेही लोकांनी सांगितले.

दरम्यान, या एन्काउंटर प्रकरणाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने या चारही आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत. तत्पूर्वी, डीएनए चाचणी करून या प्रकरणाची पडताळणी केली जाईल.