Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) हृदय विदारक प्रकरण समोर आले आहे. एका दहा वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी जिवंत जाळले. इतकेच नाही तर मुलगा आगीत जळत असताना वडील त्याच मॅचबॉक्समधून बीडी पेटवत राहिले. मद्यधुंद अवस्थेत वडिलांनी हे कृत्य केले आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. मुलगा अभ्यासाकडे लक्ष देत नसल्याने वडिलांनी हे कृत्य केले असल्याची माहिती मिळत आहे. हा दहा वर्षांच्या मुलगा 60 टक्के भाजला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की मुलाचे वडील चौकीदार आहेत आणि घटना घडल्यापासून ते फरार आहे. रविवारी रात्री कुकटपल्ली हाऊसिंग बोर्डाच्या भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आर बाळू पत्नी आणि मुलांसह केपीएचबी कॉलनीत राहतो. दोन मुली आणि दोन मुलांपैकी सर्वात लहान मुलगा चरण रात्री 9 वाजण्याच्या सुमारास खेळून घरी आला. आल्यानंतर तो घरी टीव्ही पहात होता. रविवारी सायंकाळी साडेनऊ वाजता बाळू दारू पिऊन घरी आला आणि त्याने मुलाला बिडीचे बंडल आणण्यासाठी बाहेर पाठवले.

मुलगा घरी आल्यावर इतका उशीर का झाला म्हणून बाळूने त्याला मारायला सुरुवात केली. मुलाचे अभ्यासामध्ये लक्ष नसल्यानेही बाळू नाराज होता. याच कारणास्तव त्याने मुलाला जिवंत जाळले. घटनेनंतर लगेचच शेजारचे लोक बाहेर आले व मुलाला बाहेर घेऊन गेले. मुलाला तातडीने स्थानिक गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे शरीर 60% जळाले असून गंभीर अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा: Women Set Ablaze In Nagpur: भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला भर चौकात जिवंत जाळले; नागपूर येथील धक्कादायक घटना)

मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या वेळी आरोपी बाळू दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. केपीएचबी पोलिस स्टेशनचे अधिकारी के. लक्ष्मीबी नारायण म्हणाले की, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या वडिलांची पोलिसांनी चौकशी केली आणि फरार आरोपीचा शोध सुरू आहे.