Hyderabad Horror: पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असलेल्या बापाची पोटच्या मुलीवर सेक्सची जबरदस्ती; नकार दिल्याने केली हत्या
Rape And Murder (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हैदराबादमधून (Hyderabad) वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या नदीगड्डा थांडा (Nadigadda Thanda) येथे एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या 13 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. मुलीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने वडिलांनी तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात, वडिलांनी 7 जून रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

पुढे तपासाअंती, पोलिसांना मुलीचा मृतदेह जवळच्या जंगलात आढळून आला. त्यानंतर बुधवार, 19 जून रोजी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली. वडील व्यसनाधीन आहे तसेच त्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचेही व्यसन आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार, आरोपी वडील नरेश हा महबूबाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. जूनमध्ये तो आपली पत्नी आणि मुलीसह एका किराणा कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करण्यासाठी शहरात आला. एके दिवशी सरपण गोळा करण्याच्या खोट्या बहाण्याने तो आपल्या मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने आपल्या अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मुलीने यास नकार दिला व तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, यामुळे घाबरलेल्या व्यक्तीने तिला मारहाण केली.

त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. नंतर नरेशने तिचा गळा दाबून खून केला आणि तिच्यावर मोठा दगड फेकला. त्यानंतर तो आपल्या घरी परतला आणि त्याने 7 जून रोजी मुलगी हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली. त्यानंतरच्या शोध आणि तपासामुळे पोलिसांना सहा दिवसांनंतर, 13 जून रोजी जंगलात एक अनोळखी मृतदेह सापडला. आई आणि आरोपी वडिलांच्या मदतीने पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली. (हेही वाचा: Telangana Shocker: रील बनवण्याच्या क्रेझमुळे तरुणाने गमावला जीव; गळफास लावून बनवत होता व्हिडिओ)

पुढील तपासात एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी वडील आणि मुलगी दोघे मोटारसायकलवरून जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र नंतरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वडील एकटेच परतताना दिसले. यामुळे वडिलांवर संशय आल्याने पोलिसांनी 14 जून रोजी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या कृत्यामागचा हेतूही स्पष्ट केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आयपीसी कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.