प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

तेलंगणाच्या हैदराबाद (Hyderabad) येथे सुमारे दोन वर्षांपूर्वी, 2019 मध्ये एका डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. दिल्लीमधील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी ही अतिशय भयानक अशी घटना होती. या प्रकरणातील चार आरोपींना अटक केल्यानंतर ते एन्काउंटरमध्ये मारले गेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र या आरोपींच्या एन्काउंटरबाबत देशभरात प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर न्यायालयाने एका आयोगाची स्थापना करून एन्काउंटरची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला आहे.

या अहवालानुसार बलात्कार प्रकरणातील कथित चार आरोपींबाबत खोटा एन्काउंटर करण्यात आला होता. म्हणजेच या आरोपींना जाणून बुजून मारण्यात आले होते. या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा उच्च न्यायालयाला या आयोगाच्या अहवालाबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे. आयोगात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्हीएस सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रेखा बलदोटा आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेयन यांचा समावेश होता.

या बहुचर्चित बलात्कार प्रकरणाबाबत आयोगाच्या अहवालाने हैदराबाद पोलिसांवरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठार झालेल्या चार आरोपींपैकी तीन अल्पवयीन होते. कमिशनने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पोलिसांनी आरोपींना मारण्याच्या उद्देशानेच त्यांच्यावर गोळीबार केला. या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या 10 पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शिफारसही आयोगाने केली आहे. (हेही वाचा: 17 वर्षाच्या मुलाने 13 वर्षाच्या बहिणीवर केला बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर उघडकीस आले सत्य)

नोव्हेंबर 2019 मध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद आरिफ, चिंताकुंता, चेन्नकेशावल्लू आणि जोलू शिवा या चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या चार आरोपींना संशयास्पद एन्काउंटरमध्ये ठार केले होते. या चार आरोपींना एन्काउंटरमध्ये ठार केल्यावर तेलंगणाचे तत्कालीन कायदामंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी याला देवाचा न्याय म्हटले होते. या एन्काउंटर नंतर राज्य पोलिसांचे देशभरातून कौतुक झाले होते. पोलिसांनी सांगितले होते की, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पोलिसांनी त्यांना चकमकीत मारले.