कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे भारतात सध्या 21 दिवसांचे लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 24 मार्च रोजी याबाबत घोषणा केली होती. या शटडाऊन काळात अत्यावश्यक सुविधा आणि गोष्टी सोडून इतर सर्व सेवा बंद आहेत. अशा वेळी जर दारूची होम डिलिव्हरी (Liquor Home Delivery) झाली असती तर अनेक जण खुश झाले असते. तर, याआधी अशी बातमी आली होती की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने लॉकडाऊन दरम्यान, कोलकातामध्ये (Kolkata) दारूची घरपोच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी असे अनेक अहवाल समोर आले होते, ज्यामध्ये पश्चिम बंगाल सरकारने कोलकातामध्ये दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिल्याचे सांगण्यात आले होते. अहवालात असा दावा करण्यात आला होता की, ग्राहक सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत दारूची ऑर्डर देऊ शकतात. यानंतर वाईन शॉप्स दुपारी 2 ते संध्याकाळी 5 दरम्यान ती वितरित करू शकतात.
मात्र आता हा दावा फेटाळून लावत, कोलकाताचे पोलिस आयुक्त अनुज शर्मा यांनी या अहवालात तथ्यता नसल्याचे सांगितले आहे. तसेच पश्चिम बंगाल सरकारने तसा कोणताही आदेश काढलेला नाही अशी माहिती दिली आहे. याबाबत आनंद बझारने वृत्त दिले आहे. याआधी लॉक डाऊनमुळे केरळ सरकारने डॉक्टरांच्या चिट्ठीद्वारेच दारू देण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा: Lock Down मध्ये दारू न मिळाल्याच्या नैराश्यात 46 वर्षीय इसमाची विहिरीत मारली उडी)
दरम्यान, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या वाढून 5,274 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण सक्रिय प्रकरणे 99 आहेत, तर संक्रमणामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.