Congress on Adani Row: अदानी प्रकरणी काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्रासह देशभरात LIC, SBI कार्यालयाबाहेर आंदोलन
Congress on Adani Row | (Photo Credit - Twitter/ANI)

हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) संस्थेचा रिपोर्ट आला आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाला जोरदार झटका बसला. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये झालेली कथीत आर्थिक अफरातफर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अदानींच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या सरकारी संस्थांबद्दलही चिंता व्यक्त होते आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेस (Congress) पक्षही जोरदार आक्रमक झाला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि संसदेबाहेरही याच मुद्द्यावरुन काँग्रेस आवाज उठवत आहे. काँग्रेस पक्षाने अदानी प्रकरणावरुन आज देशभर आंदोलने सुरु केल आहेत.

काँग्रेस खासदार संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करत आहेत. तर एनएसयूआय-युथ काँग्रेस संसद पोलीस ठाणे हद्दीतील एसबीआय आणि एलआयसी कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत. (हेही वाचा, Gautam Adani यांचे ग्रह फिरले; अदानी समूहाच्या तीन कंपन्या ASM यादीत, S&P Dow Jones कडूनही समभाग वगळण्याची घोषणा)

गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्र काँग्रेस आंदोलन

तामिळनाडू काँग्रेस आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात असलेल्या भाजप प्रणीत एनडीए सरकार अदानी प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अदानी प्रकरण केवळ देशच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोरदार चर्चेत आहे. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लाऊन धरला आहे. प्रामुख्याने काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक आहे. अदानी मुद्द्यावर काँग्रेस विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, भारत राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सामील होतील की त्यांना नैतिक पाठिंबा देईल याबाबत उत्सुकता आहे.

तेलंगना काँग्रेस आंदोलन

कर्नाटक काँग्रेस आंदोलन

विद्यार्थी काँग्रेस आंदोलन

जम्मू कश्मीर काँग्रेस आंदोलन (व्हिडिओ)

अदानी प्रकरणावरुन काँग्रेसने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या प्रकरणावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना 3 प्रश्न विचारले. मात्र, अद्याप तरी पंतप्रधानांनी अदानी प्रकरणावर मौनच बाळगले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस (कम्युनिकेशन) जयराम रमेश यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत लिहिले, “अदानी महामेगा स्कॅमवर पंतप्रधानांच्या बोलक्या मौनाने आम्हाला हक-हम अदानिके है कौन ही मालिका सुरू करण्यास भाग पाडले आहे. आजपासून आम्ही पंतप्रधानांना दररोज 3 प्रश्न विचारणार आहोत. येथे पहिले तीन आहेत. चुप्पी तोडिये प्रधान मंत्रीजी, असे म्हणत जयराम रमेश यांनी निशाणा साधला आहे.