हिमाचल प्रदेशमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला, असे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले, राज्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलन जिल्ह्यातील एका गावात ढगफुटीमुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी रात्री उशिरा जडों गावात ही घटना घडली. सोलोन जिल्ह्यात दोन घरे वाहून गेली असून सहा जणांना वाचवण्यात यश आल्याचे सोलनचे विभागीय आयुक्त मनमोहन शर्मा यांनी सांगितले. हरनाम (38), कमल किशोर (35), हेमलता (34), राहुल (14), नेहा (12), गोलू (8) आणि रक्षा (12) असे मृतांचे नाव असल्याचे सोलनचे पोलीस अधीक्षक (एसपी) गौरव सिंग म्हणाले. (हेही वाचा - Chennai Teen Dies by Suicide: धक्कादायक! NEET मध्ये दोनदा नापास झाल्याने 19 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; अंतिम संस्कारानंतर वडिलांनीही संपवलं जीवन)
शिमल्यात मुसळधार पावसात समरहिल भागात शिवमंदिर कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात पूजा करण्यासाठी जवळपास 50 लोक आले होते. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर होते. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथक बचाव कार्यात गुंतले होते.
गेल्या 24 तासांत हिमाचल प्रदेश आणि शेजारच्या उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना या घटना घडल्या आहेत, भूस्खलनामुळे प्रमुख रस्ते अडवले आहेत, पूल वाहून गेले आहेत, शैक्षणिक संस्था बंद पडल्या आहेत आणि नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. हिमाचल प्रदेशात, सिमला येथे झाड उन्मळून वाहनावर पडल्याने खासगी बसचा कंडक्टर जखमी झाला.