'Hawan' For Donald Trump's Well-Being: नुकतेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. पेनसिल्व्हेनिया येथे एका निवडणूक रॅलीत एका व्यक्तीने ट्रम्प यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागून गेली असली तरी, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर झालेल्या अशा हल्ल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर भारतातील सर्वसामान्य जनताही ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असून, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीसाठी हिंदू सेनेने विशेष 'हवन' (Hawan) आयोजित केला होता.
एकता आणि समर्थनाच्या भावनेने, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कल्याण आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीत हिंदू सेनेने भव्य 'हवन' आयोजित केला होता. दिल्लीतील दिलशाद गार्डनमधील माँ बगलामुखी शांती पीठ येथे हा विधी पार पडला.
या हवनाच्या माध्यमातून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लवकरात लवकर बरे व्हावे आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदू सेनेने प्रार्थना केली आहे. हिंदू सेनेने दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी महामृत्युंजय जाप हवन यज्ञ केला. या यज्ञावेळी पवित्र महामृत्युंजय मंत्राचा 1.25 लाख जप केला. या मंत्राद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. (हेही वाचा: Gunshots At Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात वाचला जीव; रॅलीत गोळीबार)
पहा पोस्ट-
Hindu Sena conducts special 'hawan' for Donald Trump's well-being in Delhi pic.twitter.com/poz0zyUBjp
— Nandini Idnani 🚩🇮🇳 (@nandiniidnani69) July 16, 2024
शनिवारी, गुप्त सेवा एजंट्सच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाच्या रॅलीमध्ये ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. थॉमस क्रुक्स असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. यानंतर हिंदू सेनेच्या प्रवक्त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करताना म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. मात्र या हल्ल्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, जिहादी मानसिकता असलेल्या लोकांना जगातून दहशतवाद संपुष्टात यावा आणि जगात शांतता प्रस्थापित व्हावी असे वाटत नाही, त्यामुळे त्यांना डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवायचे नाहीत, त्यामुळेच हा हल्ला झाला आहे.