हरियाणाचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे स्थान धोक्यात; पद रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल
दुष्यंत चौटाला (Photo Credit : ANI)

हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 (Haryana Assembly Election 2019) च्या निकालानंतर राज्यात भाजप (BJP) आणि जेजेपीची (JJP) सत्ता स्थापन झाली आहे. यासाठी झालेल्या वाटाघाटीमध्ये जेजेपीचे दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानुसार राज्यपालांनी त्यांचा शपतविधीही घडवून आणला. मात्र आता दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाचे उपमुख्यमंत्रीपद भूषवावे या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून चौटाला यांच्या उपमुख्यमंत्रीपदाला आव्हान दिले गेले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मोहाली सेक्टर 59 मधील रहिवासी हायकोर्टाचे वकील जगमोहनसिंग भट्टी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, घटनेत उपमुख्यमंत्री पदाची कोणतीही तरतूद नाही. अशा परिस्थितीत या पदावर कोणतीही नेमणूक करता येणार नाही. तसेच या पदावरील नियुक्ती नाकारून, या पदाला देण्यात आलेले सर्व फायदे व भत्ते परत मिळावेत असेही याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता चौटाला यांचे हे नवीन पद धोक्यात आले आहे. (हेही वाचा: संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दुष्यंत चौटाला यांनी व्यक्त केली नाराजी)

दरम्यान, दिवाळीच्या दिवशी (27 ऑक्टोबर) रोजी मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भाजप-जेजेपी आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. विधानसभेच्या 90 जागा असलेल्या राज्यात भाजपने 40 आणि जेजेपीने 10 जागा जिंकल्या आहेत.