हार्दिक पटेल गेले 20 दिवसांपासून बेपत्ता, पत्नी किंजल यांचा गुजरात सरकार प्रशासनावर आरोप
Hardik Patel | (Photo Credits: ANI)

गुजरात काँग्रेस नेता आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाचे प्रणेते हार्दिक पटेल (Hardik Patel) गेले 20 दिवस बेपत्ता असल्याचा आरोप हार्दिक यांच्या पत्नी किंजल पटेल (Kinjal Patel) यांनी गुजरात सरकार, प्रशासनावर केला आहे. गुजरात पोलिसांनी देशद्रोहाच्या खटल्याखाली त्यांना काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. त्यानंतर ते अद्याप ते घरी परतले नाहीत. तसेच, ते नेमके कोठे आहेत. याबाबतही कोणतीच माहिती उपलब्ध नाही, असेही किंजल यांनी म्हटले आह.

हार्दिक पटेल यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सरकारवर आरोप केला आहे. या व्हिडिओमध्ये किंजल पटेल यांनी म्हटले आहे की, गुजरात सरकार ताकदीचा वापर करुन आमच्यावर दबाव टाकत आहे. परंतू, आपण कितीही दबाव टाका आम्ही घाबरणार नाही. आमचा लढा आम्ही कायम ठेऊ, असेही किंजल यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, ऐकावं ते नवलचं! डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्गातील झोपड्या झाकण्यासाठी अहमदाबाद महापालिकेने बांधली भिंत; पहा फोटो)

दरम्यान, याच व्हिडिओत किंजल पटेल काहीशा भावनिक होतानाही दिसतात. या व्हिडिओत किंजल म्हणतात की, जेव्हा एक संपूर्ण परिवार आपल्यासोबत असतो. मात्र, आपले पती आपल्यासोबत नसतात हे अतिशय वेदनादाई आहे. गुजरात सरकारने आपल्या पतीला अटक केल्यापासून ते घरी परतलेच नाहीत. ते कोठे आहे, कसे आहेत, घरी का परतले नाही, याबाबतची माहिती सरकारने द्यावी असे त्या म्हणतात.