ज्ञानवापी मशीद संकुल (Gyanvapi Mosque Complex) प्रकरणातील एका पक्षाने मशिदीच्या आवारात शिवलिंग (Shivling) सापडल्याचा दावा केल्याच्या काही तासांनंतर, विश्व हिंदू परिषदेने (VHP) सोमवारी या ठिकाणी मंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा असल्याचे म्हटले आणि आशा व्यक्त केली की सर्वेक्षणामधून ‘स्पष्ट परिणाम’ समोर येतील. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, मशिदीच्या आवारातील शिवलिंग सापडल्याने ‘सत्य लपवण्याचा’ प्रयत्न करणाऱ्यांचे चेहरे ‘काळे’ झाले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनीदेखील सोमवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी कॅम्पसमध्ये केलेल्या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याने आनंद व्यक्त केला.
कुमार म्हणाले की, ‘सर्वेक्षणादरम्यान एका खोलीत शिवलिंग आढळून आले. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. हे शिवलिंग दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या उपस्थितीत मिळाले आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी हे शिवलिंग आहे ते मंदिर आहे. ते आता आहे आणि ते 1947 मध्ये देखील होते हे स्वतः सिद्ध झाले आहे.’ ते पुढे म्हणाले, 'हे प्रकरण न्यायालयात असल्याने यापेक्षा अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही त्यावर पुढील विचार करू आणि त्यानंतर पुढे काय पावले उचलायची हे विहिंप ठरवेल.’ (हेही वाचा: ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडल्या स्वस्तिक आणि ओमच्या खुणा)
या सर्वेक्षणानंतर अनेक संत आणि शंकराचार्यांच्या प्रतिक्रिया सातत्याने येत आहेत. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी 11 आणि 12 जून रोजी हरिद्वारमध्ये बैठक होणार आहे. विहिंपच्या प्रतिक्रियेआधी ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी मंदिर प्रकरणातील हिंदू याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांनी दावा केला की, वाराणसीमधील मशिदीच्या आवारात न्यायालयाने केलेल्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडले होते. यानंतर या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या स्थानिक न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला ज्ञानवापी मशीद संकुलातील जागा सील करण्याचे निर्देश दिले.
यावर मशीद व्यवस्थापन समितीच्या प्रवक्त्याने या दाव्याचे खंडन केले आणि एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की सापडलेली गोष्ट ही कारंजाचा एक भाग आहे. या प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.