ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) चे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार (Gunjan Patidar) यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनीही कंपनीचा निरोप घेतला होता. गुंजन पाटीदार यांनी राजीनामा का दिला, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. झोमॅटोने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, पाटीदार हे झोमॅटोच्या अशा काही कर्मचाऱ्यांपैकी एक होते ज्यांनी कंपनीसाठी मुख्य तंत्रज्ञान प्रणाली तयार केली.
साडेचार वर्षांपूर्वी झोमॅटोमध्ये सामील झालेल्या गुप्ता यांना 2020 मध्ये त्यांच्या अन्न वितरण व्यवसायाच्या सीईओ पदावरून सह-संस्थापक बनवण्यात आले होते.
गेल्या वर्षभरात झोमॅटोच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये नवीन उपक्रम विभाग प्रमुख असलेले राहुल गंजू, इंटरसिटीचे माजी उपाध्यक्ष आणि प्रमुख सिद्धार्थ झंवर आणि सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा समावेश आहे. आता शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत झोमॅटोने सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून गुंजन पाटीदार यांनी कंपनीचे टेक नेतृत्व उभे केले होते. (
हेही वाचा: Layoffs In Swiggy? स्विगी कंपनीला मोठा आर्थिक तोटा; 5% कर्मचारी कपातीची शक्यता- रिपोर्ट)
पाटीदार यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते गेल्या 14 वर्षांपासून झोमॅटोशी जोडले गेले होते. दरम्यान, 2022 च्या सप्टेंबर तिमाहीत झोमॅटोचा निव्वळ तोटा गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत 434.9 कोटी रुपयांच्या तुलनेत 250.8 कोटी झाला आहे. महसूल 62.20 टक्क्यांनी वाढून 1,661.3 कोटी रुपये झाला आहे.