स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी (Mahtama Gandhi) यांच्या मृत्यूने देशभरात खळबळ माजली होती आणि त्यावरून अजूनही कित्येक वाद सुरु आहेत. हे प्रकरण सर्वांना ठाऊक असताना गुजरात (Gujrat) मधील एका शाळेने मात्र इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना एक भलताच प्रश्न केला आहे. झालं असं की, गुजरात मध्ये सुफलाम शाळा विकास संकुल या संस्थेच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये 9वीच्या चाचणी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत हा "महात्मा गांधी यांनी आत्महत्या का केली?" असा सवाल करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच शिक्षण विभागाने तातडीने तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, उपरोक्त संस्था ही काही स्वायत्त विद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र करून बनली आहे, या विद्यालयांच्या चाचणी परीक्षेत महात्मा गांधी यांच्या आत्महत्येवरून प्रश्न करण्यात आला होता. वास्तविक असा प्रकार घडलेली ही काही पहिलीच वेळ नाही, या घटनेसोबतच 12 वीच्या विद्यार्थ्यांना देखील एक विचित्र प्रश्न करण्यात आला होता. ज्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात होणारी दारूची तस्करी याविषयी तक्रार करणारे पत्र पोलिसांना लिहायचे होते, या प्रश्नामध्ये तसे काही गैर नसले तरी गुजरात राज्यातील दारूबंदी लक्षात घेता यामागील हेतू काय असा प्रश्न निर्माण होतो.
दरम्यान, गांधीनगरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी माहिती देत याप्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले. या प्रश्नच संपूर्ण अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.