महिलांना सोन्याचे दागिने घालायची फार आवड असते. सोन्याचे दागिने घातल्याने सौंदर्य अधिक फुलून दिसते अशी भावना बहुतांश महिलांची असते. त्यामुळे लग्नसमारंभ असो किंवा कोणतेही शुभ कार्य महिला थाटामाटात सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या दिसून येतात. परंतु गुजरात (Gujrat) येथील एका महिलेला नवऱ्याने सोन्याचे दागिने घालायचे नाही अशी ताकीद दिली होती. यावरुन सदर महिलेने पोलिसात धाव घेत नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने सोन्याचे दागिने घालायचे नाही अशी सक्ती केली होती. यावरुन तिने पेशाने इंजिनअर असलेल्या नवऱ्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. तसेच नवरा मानसिक त्रास आणि सारखा भांडण करत असल्याचे ही पोलिसांना तिने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.(दिल्ली: सोन्याचे दर 38 हजाराच्या घरात तर चांदी 45 हजार रुपये)
रक्षाबंधनाच्या दिवशी सदर महिलेला एका नातेवाईकाने घरी बोलावले होते. त्यावेळी तिच्यामध्ये आणि नवरऱ्यात काही शुल्लक कारणावरुन वाद झाला. तसेच भांडणादरम्यान नवऱ्याने तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप महिलेने नवऱ्यावर लावला आहे. परंतु सोने न घालण्यावर बंदी आणण्यापाठी एक भलतेच कारण असल्याचा खुलासा महिलेने पोलिसांसमोर केला. लग्न झाल्यानंतर महिलेला तिच्या माहेरहून वीस तोळ सोने देण्यात आले होते. मात्र तरीही नवरा मला ते सोने घालायला न देता स्वत:जवळ ठेवून दिले असल्याचा आरोप महिलेने केला आहे.