Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गुजरातमधील (Gujarat) कच्छ जिल्ह्यात रोजंदारी मजुरांच्या झोपड्या जाळल्याची घटना समोर आली आहे. जवळजवळ 12 झोपड्यांना आग लागल्याचा आरोप कंत्राटदार मोहम्मद रफिक याच्यावर आहे. मजुरांनी मोफत काम करण्यास नकार दिला याचा राग रफिकच्या मनात होता. त्यामुळे थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना रफिकला जिवंत जाळायचे होते, असा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून रफिकला अटक केली आहे. ही घटना रविवारी (17 मार्च 2024) घडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कच्छ जिल्ह्यातील अंजार भागात घडली. येथील खत्री चौकाजवळ मोची बाजार असून तेथे अनेक रोजंदारी मजूर आपल्या कुटुंबासह झोपडपट्टीत राहतात. या सर्वांचा ठेकेदार मोहम्मद रफिक आहे. जादा दराने मजुरांना येथून कामासाठी नेत असल्याचा आरोप रफिकवर आहे. मात्र, तो मजुरांना दिवसाला केवळ 100 रुपये द्यायचा आणि बाकीची रक्कम स्वतःकडे ठेवायचा. याशिवाय रफिकने अनेक मजुरांची मजुरीही दिली नव्हती.

कामगार अनेक दिवस रफिककडे आपले पैसे मागत राहिले मात्र त्याने ते दिले नाही. त्यानंतर कामगारांनी मोफत काम करण्यास नकार दिला. बराच काळ रफिकसोबत कामगारांचा हा संघर्ष सुरू होता. रफिकने पैसे न दिल्याने शनिवारी कामगारांनी त्याच्यासोबत काम न करण्याचे थेट उत्तर दिले. त्यानंतर रफिक चांगलाच संतापला. यावेळी त्याने मजुरांना जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. रविवारी सकाळी अचानक कामगारांच्या झोपड्यांना आग लागली. काही वेळातच 12 झोपडपट्ट्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. घटना घडली त्यावेळी बहुतांश कामगार झोपडीत झोपले होते.

आगीमुळे मोची बाजारात गोंधळ उडाला. पोलिसांसह अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, कामगारांची घरे जळून खाक झाली. आग विझवल्यानंतर गंगाराम यादव यांच्यासह अन्य काही पीडितांनी ठेकेदार रफिकविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मोहम्मद रफिक याने आधी कामगारांच्या झोपड्यांवर ज्वलनशील पदार्थ फेकून नंतर आग लावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (हेही वाचा: Bengaluru News: घरासमोर पार्किंग केल्यामुळे जोडप्यांना बेदम मारहाण, गुन्हा दाखल; घटनेचा Video व्हायरल)

या जाळपोळीमुळे जवळून जाणाऱ्या विजेच्या तारांमध्ये स्पार्किंगही होत होते. अखेर पीडित कामगारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ठेकेदार रफिकविरुद्ध एफआयआर दाखल केला. हत्येचा प्रयत्न आणि जाळपोळ यासह विविध कलमांखाली घटनेनंतर रफिक फरार झाला होता. पोलिसांनी छापा टाकून त्याला रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. अंजारचे पोलीस निरीक्षक एसडी सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या कारवाईला दुजोरा दिला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.