Gujarat Shocker: उपजिल्हाधिकाऱ्याचे धक्कादायक कृत्य; महिला अधिकाऱ्याचा केला पाठलाग, पाठवले अश्लील फोटो, पोलिसांकडून अटक
प्रतिनिधी हेतूसाठी वापरलेली प्रतिमा  | (Photo Credits: Unsplash)

गुजरातमधील (Gujarat) मोडासामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी सायबर गुन्हे शाखेने 28 वर्षीय उपजिल्हाधिकाऱ्याला (Deputy Collector) अटक केली आहे. उपजिल्हाधिकाऱ्याने एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप आहे. उपजिल्हाधिकारी मयंक पटेल आणि महिलेची पूर्वीपासून ओळख होती. त्यानंतर अश्लिल मेसेज आणि फोटो पाठवण्याचा प्रकार सुरू झाला. पीडित महिलादेखील सरकारी विभागात अधिकारी आहे. अश्लील फोटो आणि मेसेजला कंटाळून तरुणीने सायबर गुन्हे शाखेत उपजिल्हाधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

महिलेच्या तक्रारीनंतर सायबर क्राईमने उपजिल्हाधिकाऱ्याला अटक केली. मोडासा पोलिसांनी उपजिल्हाधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपजिल्हाधिकारी मयंक पटेल हा मोडासा येथे तैनात आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्यात आक्षेपार्ह अश्लील फोटो, व्हिडिओ आणि अश्लील चॅट आढळले आहेत. आरोपी उपजिल्हाधिकारी गेल्या दीड वर्षांपासून महिला अधिकाऱ्याचा छळ करत होता.

मयंकने त्याच्या एका अधिकृत मोबाईल क्रमांकाशिवाय आणखी 8 सिम घेतले होते, ज्याद्वारे तो पीडितेला आणि तिचा पती, मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना घाणेरडे आणि अश्लील मेसेज-फोटो पाठवत असे. मयंक या महिला अधिकाऱ्याला अनेकवेळा फोन करत असे व तिने फोन उचलला नाही तर तो दुसऱ्या क्रमांकावरून किंवा दुसऱ्याच्या मोबाइलवरून व्हिडिओ कॉल करून तिला त्रास देत असे.

पीडितेने त्याचा फोन उचलणे बंद केल्यावर त्याने तिच्या पतीला फोन करून धमकीही दिल्याची माहिती आहे. सायबर क्राईमनुसार, हे दोघे पाच वर्षांपूर्वी एका सरकारी कार्यक्रमात भेटले होते. आरोपी मयंक पटेल हा खेडा जिल्ह्यातील कपडवंज शहराजवळील गावातील आहे. हे दोघे भेटले तेव्हा तो नायब तहसीलदार होता आणि जीपीएससीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. (हेही वाचा: बायको गर्भवती असल्याने शारीरिक संबंध थांबले; Sex साठी चटावलेल्या नराधमाचा 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीची हत्या)

पीडितेचा आरोप आहे की जेव्हा तिने आरोपी मयंक पटेलशी बोलणे बंद केले तेव्हा त्याने वेगवेगळ्या नंबरवरून फोन आणि व्हिडिओ कॉल करण्यास सुरुवात केली. त्याने तिला इंटरनेटच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. आता गुन्हे शाखेने मयंकला मोडासा येथून अटक केली. मयंक पटेल आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याविरुद्ध आयपीसी कलम 354-डी (पाठलाग), 500 (बदनामी), 506 (गुन्हेगारी धमकी) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.